Advertisement

‘मुंबईत ‘कराची बेकरी’ पुन्हा सुरू होणार, नावही तेच राहणार!’

काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेली मुंबईतील प्रसिद्ध कराची बेकरी पुन्हा नव्याने सुरू करण्यात येत असल्याची माहिती या बेकरीच्या मालकांनी दिली आहे.

‘मुंबईत ‘कराची बेकरी’ पुन्हा सुरू होणार, नावही तेच राहणार!’
SHARES

काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेली मुंबईतील प्रसिद्ध कराची बेकरी पुन्हा नव्याने सुरू करण्यात येत असल्याची माहिती या बेकरीच्या मालकांनी दिली आहे. एवढंच नाही, तर बेकरी कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली बंद करण्यात आलेली नसून बेकरीचं नावही बदलण्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच वांद्रे येथील प्रसिद्ध ‘कराची बेकरी’ बंद करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दबावामुळे ‘कराची बेकरी’ बंद झाल्याचा दावा मनसेचे उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी केला होता. कराची हे नाव पाकिस्तानातील शहराचं असल्याने हे नाव ताबडतोब बदलण्यात यावं किंवा बेकरी बंद करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली होती. एवढंच नाही, तर बेकरीसमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केलं होतं. त्यानंतर बेकरी बंद झाल्याने राजकीय दबावाखाली येऊन बेकरी बंद करण्यात आल्याचं म्हटलं जाऊ लागलं.

मात्र, कराची बेकरी नव्याने सुरू करण्यासंदर्भात बेकरी मालकांकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराची बेकरीचे संस्थापक या नात्याने आम्ही वांद्र्यातील आऊटलेट बंद करण्यामागील कारण स्पष्ट करू इच्छितो. कोरोनाचा फटका व्यवसायाला बसल्यामुळे तसंच जागेचा भाडेकरार संपल्यामुळे आम्ही बेकरी बंद केली आहे. बेकरीच्या नावावरून झालेल्या वादाचा हा परिणाम नाही.

हेही वाचा- ‘अँटिलिया’ प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे- अनिल देशमुख

खानचंद रामनानी यांनी १९५३मध्ये कराची बेकरीची स्थापना केली होती. आमचं या नावाशी भावनिक नातं आहे. काहीही झालं, तरी ब्रँडचं नाव बदलण्याचा आम्ही विचार करणार नाही. कारण बेकरीचा जन्म आणि ओळख या नावाने झालेली आहे. कराची बेकरी भारतात स्थापन झालेली आहे. एका भारतीयाने स्थापन केलेली आहे आणि हा भारतीय ब्रँड भारतीय कायद्याखाली नोंदवण्यात आलेला आहे.

सोशल मीडियावर कराची बेकरीच्या नावाने ज्या काही अफवा, चुकीच्या बातम्या आणि माहिती पसरविण्यात आली आहे. त्यात कुठलंही तथ्य नाही.  आता कराची बेकरी मुंबईतून कुठेही जाणार नसून दुसरी जागा सापडताच आम्ही पुन्हा बेकरी सुरू करू, असं स्पष्टीकरण कराची बेकरीच्या व्यवस्थापनाने दिलं आहे. 

कराची बेकरीच्या देशभरात २० शाखा असून दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, मुंबई आणि हैदराबाद या ५ शहरांमध्ये या शाखा विभागल्या आहेत. 

(karachi bakery outlet will start soon in mumbai)

हेही वाचा- ‘कराची स्वीट्स’वरून शिवसेनेतच दुमत!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा