Advertisement

KDMC डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचा राजीनामा

महिला डॉक्टरही मानसिक धक्क्यात"

KDMC डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचा राजीनामा
SHARES

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर झालेल्या कथित हल्ल्यानंतर एका 26 वर्षीय निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याने (RMO) राजीनामा दिला आहे. या घटनेनंतर जीवाला धोका असल्याची भीती वाटत असल्याने पुन्हा रुग्णालयात कामावर परतणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

धमक्यांमुळे भीतीचे वातावरण

संबंधित डॉक्टरांनी सांगितले की, हल्ल्यानंतर अज्ञात व्यक्तींकडून धमकीचे फोन आणि संदेश येत असल्यामुळे ते सतत आपले ठिकाण बदलत आहेत. घटनेनंतर ते रुग्णालयातही परतलेले नाहीत.

ते म्हणाले, "माझी आई शाळेत शिक्षिका आहे. ती एकटीच माझा सांभाळ करते आणि मी तिचा एकुलता एक मुलगा आहे. माझ्यासोबत काय घडले, हे सांगण्याचे धाडस माझ्यात नाही. तिला याबद्दल कळल्यास ती किती व्यथित होईल याची मला कल्पनाही करवत नाही. सध्या मी फक्त स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे."

विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरनुसार, हे डॉक्टर वाशीम जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांनी बीएएमएस (BAMS) पदवी पूर्ण केली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ते शास्त्रीनगर रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.

महिला डॉक्टरही मानसिक धक्क्यात

या घटनेत मारहाण झालेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर यांनीही हल्ल्यानंतर मानसिक धक्का बसल्याचे सांगितले आहे.

डॉ. बाविस्कर यांनी अवघ्या महिनाभरापूर्वीच या रुग्णालयात रुजू झाल्या होत्या. डॉक्टर म्हणूनच्या पहिल्याच नोकरीदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.

त्यांचे वडील महेंद्र बाविस्कर म्हणाले, "डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर झालेली मारहाण अत्यंत चुकीची आहे. आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे."

ते पुढे म्हणाले, "माझी मुलगी पूर्णपणे नैराश्यात गेली आहे. गोंधळ शांत करण्याचा आणि वरिष्ठांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असताना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी तिच्या हातावर मारहाण केली आणि शिवीगाळ केली. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली असून पुन्हा रुग्णालयात गेल्यास पुन्हा हल्ला होईल, अशी भीती तिच्या मनात आहे. त्यामुळे ती कामावर जाण्यास तयार नाही."

डॉक्टरांचा संप कायम

घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी न्यायाच्या मागणीसाठी संप पुकारला असून अद्यापही रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया सुरू झालेल्या नाहीत.

रोहित पवारांची प्रतिक्रिया

या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली.

ते म्हणाले, "रमेश म्हात्रे यांनी अजामीनपात्र गुन्हा केला आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपदही रद्द करण्यात यावे."

नेमके काय घडले?

रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सादिया पिंजारी यांनी सांगितले की, नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेची तपासणी केल्यानंतर गर्भाच्या गळ्याभोवती नाळेच्या दोन फेऱ्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने लोअर सेगमेंट सिझेरियन (LSCS) करण्याचा निर्णय घेतला.

प्रसूतीनंतर नवजात बाळाला एनआयसीयू (NICU)मध्ये दाखल करण्याची शक्यता होती. मात्र, रुग्णालयातील एनआयसीयू पूर्ण भरलेले असल्याने डॉक्टर पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत होते.

याचदरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना संपर्क केला. त्यानंतर म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांशी वाद घातला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत एका परिचारिकेला, महिला डॉक्टरला आणि भेट देणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञालाही मारहाण झाल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर डॉ. पिंजारी यांनी आपल्या डॉक्टरांच्या टीमला 24 तास पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली असून, संरक्षण मिळेपर्यंत शस्त्रक्रिया पुन्हा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

चौघांना अटक

या प्रकरणी रमेश म्हात्रे यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींची नावे अक्षय करांडे, रमेश पवार आणि शैलेश निकम अशी असून त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.



हेही वाचा

मुंबई: अनधिकृत बांधकाम आणि हॉटेल्सवर कारवाई होणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा