Advertisement

लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात कामासाठी पासाची गरज

मवार २० एप्रिलपासून ज्या भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा परिसरांना लॉकडाऊनमधून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात कामासाठी पासाची गरज
SHARES

सध्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा असून या टप्प्यात अनेक सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, सोमवार २० एप्रिलपासून ज्या भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा परिसरांना लॉकडाऊनमधून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुंबईतील ज्या विभागात लॉकडाऊन शिथिल होईल, तेथे नागरिकांना कामाच्या ठिकाणी प्रवास करण्याची परवानगी देण्यासाठी महापालिकेच्या विभाग कार्यालयातून पास दिले जाणार आहेत.

मुंबईतील ज्याठिकाणी लॉकडाऊन शिथिल होईल त्या प्रत्‍येक विभागात २ सहाय्यक विधी अधिकारी यांची नेमणूक करण्‍यात आली आहे. यांच्यामार्फत संबंधित विभागात काम करणाऱ्यांना पास दिले जाणार आहे. कोरोना संसर्गाच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍य सरकारनं सुधारित मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. काही जिल्ह्यांतील लॉकडाऊन उठल्यानंतर राज्यात कोणत्‍या कामकाजांना परवानगी दिली आहे, त्‍याचे निर्देश दिले आहेत. त्‍यासाठी नागरिकांना कामाच्‍या ठिकाणी ये-जा करण्‍यासाठी प्रवासाची परवानगी देण्‍याचे पास वितरित केले जाणार आहेत.

पालिकेतील प्रत्‍येक विभागात २ सहाय्यक विधि अधिकारी सकाळी ७ ते दुपारी २ आण‍ि दुपारी २ ते रात्री ९ अशा २ सत्रांमध्‍ये पत्र देण्याचं काम करणार आहेत. सहाय्यक विध‍ि अधि‍कारी योग्‍य ती छाननी करुन त्‍यांच्‍या स्‍वाक्षरीनं पास वितरित करणार असून नागरिकांचे कामाचे ठिकाण ज्‍या विभागाच्‍या अखत्‍यारित येते, त्‍या विभाग कार्यालयामार्फत हे परवानगी पत्र दिले जाणार आहे. 

ज्या नागरिकांनी प्रवासाची परवानगी मागण्‍यासाठी अर्ज केला आहे, त्‍यांच्‍याबाबतीत असा पास देण्‍यापूर्वी, आवश्‍यक संबंधित कागदपत्रांसाठी अर्जदाराने साध्‍या कागदावर स्‍वयंघोषित हमी पत्र दिले तरी ते पुरेसे राहाणार आहे. या सहाय्यक विधि अधिकाऱ्यांच्‍या मदतीला संबंधित विभागातील सहाय्यक आयुक्‍तांमार्फत कर्मचारी नेमण्‍यात येणार आहेत. त्‍यासाठी कोरोनासाठी यापूर्वी कामकाज पाहत नसलेल्‍या आण‍ि वसाहत, मालमत्ता, दुकानं व आस्‍थापना विभागातून कर्मचारी नेमण्‍याचे निर्देशही देण्‍यात आले आहेत. वितरित केलेल्‍या परवानगी पत्रांचा दैनंदिन अहवाल हा प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालयाकडं पाठवला जाणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा