Advertisement

रेल्वे स्थानकांवर दिसणार अधिकृत फेरीवाले

रेल्वे स्थानकांवरील अनधिकृत फरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वेनं अधिकृत फेरीवाले ही नवी सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे स्थानकांवर दिसणार अधिकृत फेरीवाले
SHARES

पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड स्थानकात चेंगराचेंगरी होऊन २३ निष्पाप जिवांचा बळी गेला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. या दुर्देवी घटनेची आठवण येताच आजही अंगावर शहारे येतात. त्यावेळी या दुर्घटनेचं खापर फेरीवाल्यांवर फोडण्यात आलं होतं.  राजकीय पक्षांनी या दुर्घटनेच्या निषेधार्थ 'फेरीवाला हटाव' मोहिमांतर्गत आंदोलनं केली. त्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात आली. मात्र, कालांतरानं स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली. त्यामुळं या वाढत्या फेरीवाल्यांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं 'अधिकृत' फेरीवाला' नावानं नवीन सुविधा आणली आहे.

परवानाधारक फेरीवाले

मध्य रेल्वेच्या या 'अधिकृत फेरीवाला' सुविधेमार्फत परवानाधारक फेरीवाल्यांची नियुक्ती केली जाणार असून, हे परवानाधारक फेरीवाले खाद्यपदार्थांची विक्री करणार असल्यची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सीएसएमटी, एलटीटीसह अन्य स्थानकांत ही सुविधा पहिल्यांदाच सुरू करण्यात येत आहे. या सुविधेर्तंगत १८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या सुविधेमुळं अनधिकृत फेरीवाल्यांचं प्रमाण कमी होऊन रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल, असा दावा रेल्वे प्रशासनानं केला आहे.

खाद्यपदार्थाची विक्री

मेल अथवा एक्स्प्रेस स्थानकात उभी असताना अनधिकृत फेरीवाल्यांकडून प्रवाशांना खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. तसंच गाड्या जास्त वेळ स्थानकात थांबत नसल्यानं प्रवासी देखीले रेल्वेच्या स्टॉलऐवजी या फेरीवाल्यांकडून खरेदी करतात. याच संधीचा अनधिकृत फेरीवालेही फायदा घेत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं अनधिकृत फेरीवाल्यांना रोखण्यासाठी स्थानकावरील रेल्वेच्याच परवानाधारक फेरीवाल्यांकडून खाद्यपदार्थ व अन्य सुविधा मिळाली, तर उत्पन्नही वाढेल, या उद्देशानं 'अधिकृत फेरीवाला' ही नवीन सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे.

कर्मचाऱ्याची नियुक्ती

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ज्या स्थानकात मेल-एक्स्प्रेस गाड्या थांबतात. त्या स्थानकातील स्टॉलधारकांना देखील या सुविधेत सामावून घेतलं जाणार आहे. या कामासाठी स्थानकातील स्टॉलधारकाकडून एका कर्मचाऱ्याची नियुक्तीही केली जाणार आहे. नियुक्ती केलेला कर्मचारी थांबलेल्या मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांना खाद्यपदार्थाची विक्री करेल. मात्र, त्या कर्मचाऱ्याला गाडीत खाद्यपदार्थांच्या विक्रीला परवानगी नाही आहे. त्यानुसार, सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस यांसारख्या स्थानकांत खाद्यपदार्थाची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

फेरीवाल्यांवर कारवाई

स्थानकांवरील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात ही सुविधा सुरू केली असली, तरी रेल्वे प्रशनानं फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेअनेक रेल्वे स्थानकांवर कोणत्याही भीतीची परवा न करता फेरीवाले वस्तूंची विक्री करत आहेत. तसंच, त्यावर रेल्वे प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याच स्पष्ट होत आहे.

फेरीवाला क्षेत्र

फेरीवाला क्षेत्रासाठी १० फुटांचा फूटपाथ आवश्यक आहे. तसंच शाळा, धार्मिक स्थळं, रुग्णालयांपासून १०० मीटर अंतरावर व रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरावर फेरीवाला क्षेत्र होणार नाही, असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे. एल्फिन्स्टन दुघटनेनंतर मुंबई महापालिकेनं रेल्वे स्थानक व गर्दीच्या परिसरातील फेरीवाले हटवण्यासाठी मोहीम सुरू केली. मात्र, अवघ्या ५ महिन्यांत या मोहिमेचे तीनतेरा वाजले. दादर, विलेपार्ले, कुर्ला, गोरेगाव, बोरिवली, सीएसटी परिसरात फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान बसवलं.

प्रवासी संख्येत वाढ

'लोकल' ही मुंबईकरांची लाइफलाइन असून, दररोज लाखोंच्या संख्येनं प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. दरम्यान, मागील काही काळापासून लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. वाढत्या संख्येमुळं लोकलमध्येही प्रवाशांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या अनेक स्थानकांवर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळं रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अनेकदा प्रवाशांना आपाला जीव गमवावा लागतो. तर काही जण जखमी होतात. अशातच फेरीवाले वाढले तर चेंगराचेंगरीच्या घटना होण्याची शक्यता वाढेल.

वाहतूक विस्कळीत

मागील अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक काही ना काही कारणांत्सव विस्कळीत होत आहे. वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांची गैरसोय होते. तसंच, लोकल उशिरानं धावत असल्यानं स्थानकांवरही प्रवाशांची जबरदस्त गर्दी जमते. त्यावेळी प्रवाशांना लोकलमध्ये धक्काबुक्की  करत चढावं लागतं. दरम्यान, सध्या पावसाळा सुरू असून, जास्तीचा पाऊस झाल्यास लोकल रद्द केल्या जातात. त्यातच अनेक स्थानकांवरील पादचारी पूल आणि छतांच्या दुरूस्तीची काम सुरू असल्यामुळं स्थानकांवरील पर्यायी पूलावर प्रवाशांची गर्दी होऊन चेंगराचेगरी होण्याची शक्यता असते.

रेल्वे प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून वारंवार या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रारी केल्या जातात. मात्र, तक्रारी करूनही रेल्वे प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळं येत्या काळात अनधिकृत फेरीवाल्यांवर रेल्वे प्रशासन कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

धोनी निवृत्तीचा विचारही मनात आणू नकोस - लतादीदी

पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या फेऱ्या वाढणार


Disclaimer: All views expressed in this article are personal and purely as per the author. Mumbai Live holds no opinion on the content of the article and does not promote any particular view or sentiment.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा