Advertisement

स्वच्छतागृहे बंद करण्यात आल्यानं स्थनिकांचे हाल

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील आदिवासी पाड्यांवर अनेकांकडे स्वच्छतागृहांची सोय नाही.

स्वच्छतागृहे बंद करण्यात आल्यानं स्थनिकांचे हाल
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आलं आहे. अशातच काहींची स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्यामुळं हाल होत आहेत. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील आदिवासी पाड्यांवर अनेकांकडे स्वच्छतागृहांची सोय नाही. काही पाड्यावर पक्की स्वच्छतागृहे आहेत, मात्र त्याची दुरवस्था झाली आहे, तर काही पाड्यांवर मोबाइल स्वच्छतागृहे आहेत. अशा परिस्थितीत दिवसा उद्यानातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर पर्यटकांव्यतिरिक्त स्थानिकांकडूनही होतो. परंतु, लॉकडाऊननंतर ही स्वच्छतागृहेही बंद करण्यात आल्यानं स्थनिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळं यातील काही स्वच्छतागृहे वापरायला मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ह्युमन राइट्स काऊन्सिल ऑफ इंडियाचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील स्थानिक संजू नाडार यांनी यासंदर्भात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानेच मुख्य वनसंरक्षक, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना पत्र लिहिल्याचं समजतं. या पत्रात ही स्वच्छतागृहं सॅनिटाइज करण्यात आलेली नाही, असा मुद्दा मांडण्यात आला आहे. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटकही येत असतात. मात्र, लॉकडाउन जाहीर झाल्यावर ती सॅनिटाइज न करता बंद केल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसंच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील स्वच्छतागृहं अचानक बंद झाल्यानं स्थानिकांची काही प्रमाणात अडचण होत असल्याचंही समजतं.

सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही प्राण्यांची भटकंती सुरू असल्याचे स्थानिकांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी स्वच्छतागृहांची सोय नाही तिथे उघड्यावर जाणं हे धोकादायक आहे. आरोग्याच्या दृष्टीनं ही ही बाब लक्षात घ्यायला हवी. मिनी ट्रेनच्या परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांना सध्या तेथील स्वच्छतागृहे बंद झाल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही स्वच्छतागृहे पर्यटकांसाठी असली तरी सध्याच्या काळात आरोग्याच्या दृष्टीने या सगळ्याचा विचार करून ज्या स्वच्छतागृहांचा वापर स्थानिकांकडूनही होतो, त्यातील काही स्वच्छतागृहे वापरायला मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

ठाणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी सार्वजनिक स्वच्छतागृहे नागरिकांच्या वापरासाठी खुली करण्यात यावी या विचारास पाठिंबा दर्शवला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलून सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करत ही सार्वजनिक स्वच्छतागृहे लोकांसाठी कशी उपलब्ध करून देता येईल त्याचा विचार करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा