Advertisement

वरळीच्या समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी


वरळीच्या समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी
SHARES

पावसाला सुरूवात होताच वरळीच्या समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांची गर्दी वाढू लागते. येथील समुद्र किनारा धोकादायक असल्याचा फलक लाऊन देखील पर्यटक सेल्फी काढण्याच्या नादात खोल समुद्रात शिरतात. दगडांवर बसून सेल्फी काढणे किंवा गप्पा मारण्यात मग्न होऊन लाटांच्या विळख्यात अडकतात. भरतीत अडकलेल्या अनेक पर्यटकांना मागील काही दिवसांमध्ये वाचविण्यात आले. त्यातील अनेकांच्या जीवावर बेतल्याचे येथील स्थानिक सांगतात. अशा अतिउत्साही पर्यटकांना आवरण्यासाठी वरळीच्या समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमला जावा यासाठी वरळी युवा सेनेचे उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांना या संदर्भात निवेदन देखील देण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था निर्माण व्हावी, सध्या वर्षभर नसली, तरी किमान पावसाळ्याच्या कालावधीत तरी येथे सुरक्षा व्यवस्था असावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. सेल्फीचे फॅड गेल्या 2-3 वर्षांत वाढल्यामुळे सुरक्षा रक्षकाची नितांत आवश्यकता असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मी 1972 पासून वरळीत रहातो. वरळी समुद्र किनाराही पूर्वीच्या तुलनेत खूप बदलला आहे. सी लिंक झाल्यापासून हा किनारा अनेकांना आकर्षित करू लागला आहे. खासकरून पावसाळ्यात तरुणाईचे हे आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. समुद्र किनारी बसण्याची व्यवस्था असूनही अनेक मंडळी आतमध्ये उतरुन फोटो काढण्यात गर्क असतात. त्यामुळे येथे अपघात होऊ नयेत यासाठी महापालिकेने किनाऱ्यावर सुरक्षा रक्षक नेमावेत अशी आमची मागणी आहे. दरदिवशी या ठिकाणी पोलीस असतात. पण पावसाळ्याच्या दिवसांत या ठिकाणी आपात्कालीन व्यवस्था असावी. कुणाचाही जीव धोक्यात येऊ नये, अशी आमची मागणी आहे.

मनोज केळकर, स्थानिक नागरीक

वरळीच्या समुद्र किनाऱ्यावर पोलिसांप्रमाणेच महापालिकेचे सुरक्षा रक्षक असावेत. जीव रक्षक बोटी असाव्यात, पावसाळ्यात आपात्कालीन व्यवस्था असावी, यासाठी मी मागणी केली आहे. स्थानिकांच्या मागणीनुसार माझे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त, वरळीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांना देखील मी निवेदन दिलेले आहे.

अभिजित पाटील, उपविभाग अधिकारी, युवा सेना (वरळी विधानसभा)

यासाठी विभागातील शिवसेनेचे नगरसेवक तथा जी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष अशिष चेंबूरकर देखील प्रयत्नशील आहेत. आमच्या या मागणीची दखल घेऊन लवकरच काहीतरी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा