Advertisement

वीतभर रस्ता!


वीतभर रस्ता!
SHARES

गेले तीनेक महिने

माझा वावर असतो किचनमध्ये

वारंवार हात धुण्याच्या निमित्ताने

थोडंसं पाणी पिण्याच्या निमित्ताने

किचनच्या खिडकीतून रोज 

मी सतत निरखत असतो तो रस्ता

त्यासाठीच जात असतो मी किचनमध्ये

हजारदा डोकावत असतो मी बाहेर

थोडंसं उजव्या बाजूला झुकून

वीतभर का होईना 

तो रस्ता दिसत असतो 

मला खात्री आहे कधीतरी

कुणीतरी जाताना दिसेलच 

लॉकडाऊनमुळे सीलबंद झालीत घरे

मला कुणीच बाहेर जाऊ देत नाही

सकाळ दुपार नि संध्याकाळही

पुसून टाकलीय कुणीतरी माझी

कधी कधी माझंच शरीर हसतं मला

आतून खी खी करतं

मनाचा दरवाजा बंद झालाय

मेंदू गुंडाळून ठेवलाय

कुणीतरी मळकट कपड्यात

डोळे झाले आहेत कावरेबावरे

अन.... एका कातरवेळी

थोडंसं अंधारल्या वेळी म्हणा

खिडकीजवळ चकाकलं काहीतरी

क्षणभर का होईना उजळून गेलं 

चटकन म्हटलं मी माझ्या पत्नीला

बघ ना बाहेर, काहीतरी दिसतंय

बघ त्या रस्त्यावर, नीट बघ

कुणीतरी नक्कीच आहे तिथं

कुणीतरी गेलंय का तिथून?

म्हटलं तिला लवकर बघ 

निर्विकारपणे म्हणाली ती

तुम्ही आवाज नाही का ऐकला

अरे हो, मी कितीतरी दिवस

काहीच ऐकलं नाहीय मी बाहेरचं

ना चिमण्यांचा आवाज

ना कावळ्या, कबुतरांची फडफड

कानाचे पडदे जीर्ण झालेत की काय!

तरीही मी विचारतो पत्नीला अधीर होत

सांग...सांग..कसला आवाज होता तो

नक्कीच कुणाच्या पायतानांचा

कुणी सायकलवरनं गेला असेल

सांग ना कोण होता तो ?

म्हणाली, अॕम्ब्युलन्सचा आवाज होता तो

माझा हात छातीकडे जातो

हृदयाचे ठोके खिजवतात मला

मी थोडंसं पाणी पितो

आता हळूच खिडकीबाहेर पाहतो

वीतभर रस्ता तसाच पडून राहिलेला

हॉस्पिटलच्या खाटेवर

पांढऱ्या चादरीसारखा निष्प्राण

खिडकीतून नेहमी दिसणारं हे चित्र

मळकट कागदावर गिरबटलेलं

डाव्या बाजूला कुठलं तरी

टॉवरचं अर्धवट काम पडलेलं

काळे ठिक्कर होऊन उसवलेले खांब

आणि या दोन्ही बाजूला

झापडं लावल्यासारख्या

दोन जुनाट बुरसटलेल्या इमारती

रिकामी झालेल्या की केलेल्या

आणि त्यातून तो वीतभर रस्ता दिसतो

विनय सांगत होता परवा फोनवर 

त्याचे कान विटलेत म्हणे

रोज रोज अॕम्ब्युलन्सच्या आवाजाने

आता त्याला काहीच वाटत नाही

तो काहीही बडबडत असतो

मी सांगतोय त्यांना

बघा त्या रस्त्यावर नीट बघा

कुणीतरी जाताना दिसेल

जिवंत कुणीतरी नक्कीच दिसेल

तुम्ही नीट बघा, माझं ऐका

पूर्वी अगदी पहाटे रोज एक

पांढरा सदरेवाला जायचा तिथून

तो पहिलावहिला असायचा कायम

नंतर तो दुसरा

डोक्यावर दुधाचा हंडा घेतलेला

त्यापाठोपाठ तीन-चारजण 

मग हळूहळू खूप जण

मग बरेच जण व्यापून टाकायचे तो रस्ता

ते सगळे गेले कुठे?

विनय काही सांगतच नाही मला

ती म्हातारी, गाईला घेऊन जाणारी

वेडीवाकडी धावणारी 

त्याच रस्त्यावर काठी वाजवणारी

ती गेली कुठे? ती गाय कुठेय?

असं कसं झालं?

माझ्यासारखं सगळं जग

अंग चोरून बसलंय तरी कुठे?

आणि त्याच वेळी....

काहीतरी हलतं तिथे रस्त्यावर

मी पत्नीला म्हणतो

बघ, लवकर बघ तिथं

काहीतरी हलतंय बघ रस्त्यावर

मला नीट दिसत नाहीय

आहे, तिथे जिवंतपणाचं लक्षण

पत्नी वाकून पाहतेय

म्हणते, बघा तो कागद उडालाय

म्हणे जिवंतपणा, बघा तुम्हीच

मी निराश होत किचनबाहेर येतो

माझा नेहमीचा कोपरा पकडतो

तो प्रश्न मला कायमच सतावतो

कुणीच कसं दिसत नाही

छे छे असे कसे होईल

मला जाणवतो माझ्यातलाच

थंड होत चाललेला अशक्तपणा

मी उगाचच चाचपडतो

पाठीमागची भिंत थरथरत्या हातांनी 

दुसऱ्या दिवशी पहाटे नेहमीप्रमाणे

मी लवकर उठून किचनकडे जातो

माफ करा मी लवकर म्हटलं

खरं तर मी अलीकडे झोपतच नाही

डोळे बंद करताच 

लख्ख उजेड दिसतो

पांढरा फटफटीत

कुणीतरी टॉर्च मारल्यासारखा डोळ्यात

अलीकडे घरातले नीट वागत नाहीत

अधूनमधून पाहतायत मला

काल बहुदा माझाच विषय होता

विनय माझ्याकडे बघून सांगत होता

फोनवर कुणाशीतरी बोलत होता

काय असेल कुणास ठाऊक

आतातर कुणी जवळपास येत नाही

दुपारी पत्नी मला कसली तरी गोळी देते

मी म्हणतो तिला, कशाला आता हे

तिला माझी काळजी असते म्हणे

मी विचारतो तिला, 

कुणी दिवसभरात दिसलं का

त्या रस्त्यावरून कुणीतरी गेलं का?

दोनेक दिवस तसेच गेलेले

रस्ता तसाच घटका मोजीत बसलेला

आता तर मला उठतादेखील येत नाही

त्यानंतर सगळं धूसर होत गेलेलं

मी पत्नीला हाक मारतोय पण

माझा आवाज मलाच ऐकू येत नाही

त्यानंतर काहीच आठवत नाही

पण एक रस्ता मात्र स्पष्ट दिसतोय

निळसर रस्ता, वळणदार झालेला

वर उंचावर कुठेतरी लांब जाणारा रस्ता

आणि मार्गात कसले तरी

छान छान पांढरे पुंजके कापसासारखे

पण असं काय होतंय? 

मी चालतोय खरा, पण ...पण

पण अधांतरी का चालतोय?


हेही वाचा- 

वो तो है सटकेला!

एक प्रवास अमिताभचा आणि आपलाही!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा