Advertisement

विद्यार्थ्यांना दप्तरांसाठी शाळेमध्येच लॉकर!


विद्यार्थ्यांना दप्तरांसाठी शाळेमध्येच लॉकर!
SHARES

शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्याची मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून होत असली तरी अद्यापही मुलांच्या दप्तराचा भार हलका झालेला नाही. दप्तरातील वजन कमी करण्यासाठी अाता पुस्तकांची संख्या कमी करण्याची सूचना होऊनही बराच काळ लोटला. तरी अजूनही शाळांकडून याची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. परिणामी आजही मुलांना पाठीवरून 'वजन'दार दप्तरांचा भार पेलावा लागत आहे. यावर उपाय म्हणून मुलांच्या पुस्तकाचं दप्तर शाळेत कपाटात ठेवलं जावं आणि यासाठी मुलांना लॉकरची व्यवस्था उपलब्ध करून दिली जावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.


नगरसेविका सेजल देसाईंनी केली मागणी

भाजपच्या नगरसेविका सेजल देसाई यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी महापालिका सभागृहात केली आहे. देसाई यांनी महापालिकेच्या तसेच सर्व खासगी शाळांमध्ये मुलांना लॉकरची सुविध उपलब्ध करून दिली जावी, अशी सूचना केली आहे. लॉकरची सुविधा मुलांना उपलब्ध झाल्यास विद्यार्थी आपल्या दैनंदिन शिक्षणाच्या वह्या तसंच पुस्तकं शाळेतील लॉकरमध्येच ठेवतील आणि इतर शैक्षणिक साहित्य आवश्यकतेनुसार शाळेत घेऊन येतील. त्यामुळे त्यांच्या दप्तराचं ओझं निश्चितच कमी होईल, असं सेजल देसाई यांनी म्हटलं आहे.


लहान मुलांना दप्तरामुळे होताहेत व्याधी

मुंबईत शाळेत जाणाऱ्या शालेय मुलांच्या दप्तराचं ओझं कमी करण्याची मागणी वारंवार करण्यात येत असली तरी सुधारित अभ्यासक्रमानुसार त्यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. शाळेत जाणार मुलं ही अापल्या शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक वजनाच्या दप्तराचं ओझं वाहून नेत अाहेत. त्यामुळे लहान वयातच विविध प्रकारच्या शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतं अाहे.

शिक्षकांकडून वेळापत्रकांचं योग्य नियोजन करून कमीत कमी विषयांची वह्या-पुस्तकं आणण्यास सांगूनही दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. असेच होणार असेल तर शाळांनी लॉकरची व्यवस्था करावी आणि त्यामध्ये ही मुले आपली सर्व वह्या-पुस्तके ठेवतील. त्यामुळे शाळांचा जो कोणत्या विषयांचा गृहपाठ असेल तेवढीच वह्या-पुस्तके ते घरी घेऊन जातील. यामुळे निश्चितच मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी होईल.
- सेजल देसाई, भाजप नगरसेविका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा