मराठा समाजाचा मंगळवारी महामोर्चा

 Fort
मराठा समाजाचा मंगळवारी महामोर्चा
Fort, Mumbai  -  

सकल मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आझाद मैदान ते मंत्रालय अशा महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोमवारी भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आली आहे. मंगळवारी होणाऱ्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने मराठा समाजाचे नागरिक सहभागी होणार आहेत.

शासनाने अद्याप मराठा समाजाचे प्रश्न सोडवलेले नाहीत. मराठा समाजाने क्रांती मोर्चा शिस्तबद्ध आणि शांतताप्रिय पद्धतीने काढला. तरीही शासन अद्यापही योग्य ताे निर्णय घेऊ शकले नाही. मराठा हा बहुतांशी शेतकरी आहे. सरकार स्वामीनाथन आयोग लागू करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळत नाही. वीजबील भरणे, मालाला योग्य भाव न मिळणे, त्यामुळे या समाजाचे शोषण होत आहे. कोपर्डी प्रकरणातील दोषी आरोपींना फाशीची शिक्षा लवकरात लवकर करावी, अशी आमची मागणी असल्याचे भारतीय मराठा महासंघाचे राज्याचे युवा अध्यक्ष बलराम भडेकर यांनी यावेळी सांगितले. आमच्या मोर्चाला 13 संघटनांचा पाठिंबा असून, शिवसंग्राम संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलेला नाही. आमच्या मागण्या मान्य होईपर्यँत आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही बलराम भडेकर यांनी यावेळी दिला.

Loading Comments