Advertisement

गरीबांना मोफत अन्नधान्य, फेरीवाले, रिक्षाचालकांना अर्थसहाय्य.., मुख्यमंत्र्यांनी केलं ‘पॅकेज’ जाहीर

कोरोना संसर्गाच्या साखळीला तोडण्यासाठी १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ही घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांसाठी ५ हजार ४७६ कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज देखील जाहीर केलं आहे.

गरीबांना मोफत अन्नधान्य, फेरीवाले, रिक्षाचालकांना अर्थसहाय्य.., मुख्यमंत्र्यांनी केलं ‘पॅकेज’ जाहीर
SHARES

कोरोना संसर्गाच्या साखळीला तोडण्यासाठी बुधवार रात्री ८ वाजेपासून १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ही घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांसाठी ५ हजार ४७६ कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज देखील जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवार रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

३ किलो गहू, २ किलो तांदूळ मोफत

अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ७ कोटी लाभार्थ्यांना पुढील महिनाभर प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत देण्यात येईल. 

शिवभोजन थाळी पुढील महिनाभर मोफत दिली जाईल. दिवसाला २ लाख थाळ्यांचं वाटप करण्यात येईल. रोजीचं नुकसान होईल, पण गरीबांच्या रोटीची सोय यामुळे होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

निराधार, विधवा, दिव्यांगांना आगाऊ लाभ

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा ५ योजनेतील सुमारे ३५ लाख लाभार्थ्यांना २ महिन्यांसाठी प्रत्येकी १ हजार रुपयांचं आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल.

हेही वाचा- १५ दिवसांच्या संचारबंदीत काय सुरू, काय बंद? वाचा

बांधकाम मजूर, घरेलू कामगारांना मदत

महाराष्ट्रातील सुमारे १२ लाख नोंदणीकृत बांधकाम मजुरांना महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून प्रत्येकी १५०० रुपयांचं अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

रिक्षाचालक, फेरीवाल्यांना अर्थसहाय्य

राज्यातील सुमारे ५ लाख नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम स्वनिधी योजनेमार्फत थेट फेरीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. राज्यातील सुमारे १२ लाख परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येईल.

आदिवासींना मदत

आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब २ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल.

सोबतच जिल्हास्तरावरील कोविड नियोजनासाठी सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य सुविधा उभारण्यासाठी हा निधी संबंधित जिल्ह्यासाठी वापरता येईल.

(maharashtra cm uddhav thackeray declared financial aid package for poor and workers during lockdown)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा