SHARE

दिवाळीची लगबग सुरू झाली असून बच्चे कंपनीसह मोठ्यांनाही फटाक्यांच्या खरेदीचे वेध लागलेत. रंगीबेरंगी, मोठाल्या आवाजाचे फटाके उडवण्याचे प्लॅनही तयार झालेत. पण यंदा दिवाळीत फटाक्यांचा बार उडवता येईल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कारण दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातही फटाकेबंदी लागू होण्याची शक्यता आहे. तसेच संकेत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत.

महाराष्ट्रात फटाके बंदी लागू करण्याच्या विचारात सरकार असून त्यासंबंधी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कदम यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात आणि फटाक्यांचा आवाज बंद करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मंत्रालय परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कदम यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीची शपथ देण्यात आली. त्यावेळी कदम यांनी ही माहिती दिली. 

दिल्ली, एनसीआरमध्ये फटाके विक्रीवर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने यावर्षीही कायम ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातही फटाके विक्री आणि फटाके उडवण्यावर बंदी घालण्याची मागणी होत होती. दरम्यान शाळांमधून प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ विद्यार्थ्यांना मंगळवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करतील अशी शक्यता आहे. त्यातच फटाके बंदी लागू झाली तर ही दिवाळी खऱ्या अर्थाने प्रदूषणमुक्त दिवाळी होईल.


दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी

दिल्लीत यावर्षी विनाफटाक्यांची दिवाळी साजरी होणार आहे. फटाके विक्रीवर गेल्या वर्षी घालण्यात आलेली बंद सुप्रीम कोर्टाने यावर्षीही कायम ठेवली आहे. पोलिसांनी दिलेले सर्व परवाने रद्द करण्यात आले आहेत.

यावर्षी 12 सप्टेंबर रोजी देण्यात आलेला आदेश 1 नोव्हेंबारपासून लागू होणार आहे. या आदेशामध्ये दिल्ली, एनसीआरमध्ये काही अटींसह फटाके विक्रीला परवानगी देण्यात आली होती. मात्र आता या नव्या आदेशामुळे विक्रेत्यांना 1 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री करता येणार नाही.


कायमची बंदी हवी

फटाकेबंदी लागू झाली तर यासारखी आनंदाची दुसरी कोणती गोष्ट नाही. यासंबंधीचा अंतिम निर्णय लवकरच मुख्यमंत्र्यांना घ्यावा आणि योग्य अंमलबजावणी करावी हीच अपेक्षा. पण त्याचवेळी जनतेच्या आरोग्याच्यादृष्टीने केवळ दिवाळीपुरती नव्हे, तर फटाक्यांवर कायमची बंदी टाकण्याची गरज आहे. त्यादृष्टीनेही आता विचार होण्याची गरज आहे.

- सुमायरा अब्दुल अली, अध्यक्ष, आवाज फाऊंडेशन


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या