Advertisement

Shiv Bhojan Thali: मुंबई-ठाण्यात जूनमध्ये ३.२९ लाख शिवभोजन थाळ्यांचं वाटप

मुंबई शहर उपनगर आणि ठाण्यामध्ये १ जून ते ३० जून २०२० पर्यंत ५६ शिवभोजन केंद्रातून ५ रूपये प्रति थाळी याप्रमाणे ३ लाख २९ हजार ५१५ शिवभोजन थाळ्यांचं वाटप करण्यात आलं आहे.

Shiv Bhojan Thali: मुंबई-ठाण्यात जूनमध्ये ३.२९ लाख शिवभोजन थाळ्यांचं वाटप
SHARES

मुंबई शहर उपनगर आणि ठाण्यामध्ये १ जून ते  ३० जून २०२० पर्यंत ५६ शिवभोजन केंद्रातून ५ रूपये प्रति थाळी याप्रमाणे ३ लाख २९ हजार ५१५ शिवभोजन थाळ्यांचं वाटप करण्यात (maharashtra government distribute 3 lakh 29 thousand shiv bhojan thali at mumbai and thane in june 2020) आलं आहे. तसंच ४ हजार २२३ स्वस्त धान्य दुकानांमधून १ जून ते ३० जून २०२० पर्यंत १७ लाख ९९ हजार २५२ शिधापत्रिका धारकांना ७ लाख २ हजार ९१० क्विंटल अन्नधान्याचं वाटप करण्यात आल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली.   

लॉकडाऊन संपलेला असला तरी असामान्य परिस्थिती असल्यामुळे राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी आणखी ३ महिने ५ रुपयामध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ ५ रुपयांमध्ये गरजूंना जेवण देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा ५ रुपये दर सप्टेंबरपर्यंत  लागू राहणार आहे. 

हेही वाचा- Shiv Bhojan Thali: राज्यात १ कोटी शिवभोजन थाळ्यांचं वाटप

कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११  ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे.  शहरी भागासाठी प्रति थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रति थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणं तसंच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून देणं, जेवण तयार करण्याआधी हात कमीत कमी २० सेकंद साबणाने स्वच्छ करणं, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणं, भोजन तयार करणाऱ्या तसंच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणं, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणं त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकामध्ये कमीतकमी ३ फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रति लाभार्थी प्रति महिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. १ जून ते ३० जून एकूण १३ लाख ७७ हजार ६०४ रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केलं आहे. या रेशनकार्डवर सुमारे ६४ लाख लोकसंख्येला ३ लाख ४हजार क्विंटल तांदळाचं वाटप झालं आहे.  

हेही वाचा- शिवभोजनथाळीसाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून 5 कोटींचा निधी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा