Advertisement

३१ डिसेंबरसाठी राज्य सरकारच्या 'या' आहेत गाइडलाइन्स

३१ डिसेंबर रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी नववर्षाचे स्वागत करण्याच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे, असं सरकारने म्हटलं आहे.

३१ डिसेंबरसाठी राज्य सरकारच्या 'या' आहेत गाइडलाइन्स
SHARES

कोरोनाचा नवीन विषाणू सापडल्यामुळे राज्यात २२ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी  २०२१ या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. आता राज्य सरकारने आता ३१ डिसेंबरसाठी महत्त्वाच्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.  ३१ डिसेंबर रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी नववर्षाचे स्वागत करण्याच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे, असं सरकारने म्हटलं आहे.

विशेष गाइडलाइन्स

१. नागरिकांनी ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे.

२. ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) राहील तसंच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

३. विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.

४. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

५. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसंच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

६. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसंच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

७. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.

८. कोविड-१९ या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

९. या परिपत्रकानंतर ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्ष सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. अशा सूचना गृह विभागामार्फत निर्गमित करण्यात आल्या असून नागरिकांनी यांचे पालन करावे, असं आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.हेही वाचा -

मुंबई लोकलमध्ये होणार 'कोरोना'बाबत जनजागृती

जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य; मनसेची पत्राद्वारे पश्चिम रेल्वेकडे मागणीRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा