Advertisement

मुंबईत रात्री 'या' वेळेत घराबाहेर पडण्यावर निर्बंध


मुंबईत रात्री 'या' वेळेत घराबाहेर पडण्यावर निर्बंध
SHARES

मुंबईत करोनामुळे ५१० नवीन रुग्णांची भर पडली असून, २४ तासांत १८ मृत्यू झाला आहे. मुंबई हा करोनासाठी रेड झोन बनला आहे. त्यामुळं लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन व्हावं या उद्देशानं पावले उचलण्यात आली आहेत. राज्य सरकारने सोमवारी दिलेल्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी शहरात रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत घराबाहेर पडण्यावर निर्बंध आणले आहेत. मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार संध्याकाळी ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत एकाहून जास्त व्यक्तीस वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त बाहेर पडण्यावर मनाई केली आहे. हा मनाई आदेश मोडल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत यापूर्वी असलेल्या आदेशाची अंमलबजावणी सुरू असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळं जीवनावश्यक वस्तू तसेच औषधांची कोणतीही गैरसोय होणार नाही, हेसुद्धा स्पष्ट झालं आहे. देशात आणि राज्यात १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत वाढवण्यात आली आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून १७ मेच्या मध्यरात्रीपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. या आदेशानुसार ४ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमा होण्यास मनाई राहणार आहे. लॉकडाऊनचे पालन व्हावे या उद्देशाने पावले उचलण्यात आली आहेत. सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू तसेच औषधांच्या खरेदीसाठी मर्यादित स्वरूपात बाहेर जाण्याची मुभा राहणार आहे.

सोशल डिस्टन्सिंगचं पालन बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणं, नियमांचे उल्लंघन केल्यास कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा