SHARE

पोलिस विभागाच्या इमारती, तसेच गृह प्रकल्पांस तांत्रिक सहकार्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाने भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) मुंबईबरोबर सामंजस्य करार केला आहे.


पोलिसांसाठी बांधणार १ लाख घरं

पोलिस गृहनिर्माण महामंडळाने पोलिसांसाठी सुमारे एक लाख घरे बांधण्याचे ठरविले आहे. ही घरे जलदगतीने पूर्ण व्हावीत, यासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असून, त्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या करारानुसार तांत्रिकदृष्ट्या मजबूत, दीर्घकाळ टिकणाऱ्या, कार्यपूरक व हरित इमारत संकल्पनेनुसार बांधकामाचे आराखडे ‘आयआयटी’ तयार करणार आहे.


तांत्रिक बाबींमध्ये आयआयटीचं सहकार्य

त्याशिवाय तांत्रिक परीक्षण, इमारतीच्या आराखड्याची तपासणी पद्धती, कामाची तपासणी आणि त्याचे समीक्षण करणे, आधुनिक किफायतशीर बांधकाम तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आदी तांत्रिक बाबींबाबत ‘आयआयटी’ मार्गदर्शन करणार आहे.

पोलिसांसाठी सदनिका, पोलीस विभागाच्या प्रशासकीय इमारती, पोलीस ठाणी, कारागृहे आदींचे बांधकाम या महामंडळाच्या वतीने करण्यात येते. हे काम जलदगतीने व्हावे, असा या सामंजस्य करारामागील उद्देश आहे.

सध्या राज्यात महामंडळामार्फत 36 मोठे प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्ये 3 हजार 344 सदनिका, 1 हजार 652 क्षमतेची 8 वसतिगृहे, 11 पोलीस ठाणी, 40 वर्गखोल्यांच्या 6 इमारती, 9 प्रशासकीय इमारती, 1 समादेशक कार्यालय, 4 कौशल्य विकास केंद्रे आणि 1 महासंचालनालयीन कर्मचाऱ्यांसाठी शिबीर कार्यालय आदींचा समावेश आहे.


संबंधित विषय
ताज्या बातम्या