गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद सणानिमित्त महाराष्ट्र सरकारने एक दिवसांची शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी (दि. २८ सप्टेंबर) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती.
राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता.
अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद-ए-मिलाद मिरवणुका काढल्या जातात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी मिरवणुका काढण्यात आल्याने पोलीस यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन 29 सप्टेंबर ही सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा