Advertisement

दिरानं फसवलं, महिला आयोगानं तारलं!


दिरानं फसवलं, महिला आयोगानं तारलं!
SHARES

'हक्क आणि कष्टाचा पैसा कुठेही जात नसतो, तो परत मिळतोच, हीच बाब मुंबईतील मिताली कांबळे यांच्याबाबत खरी ठरली आहे. खरंतर मिताली यांच्या दीरानेच त्यांची फसवणूक केली होती. पण राज्य महिला आयोगाकडे दाद मागितल्यानंतर अखेर त्यांना न्याय मिळाला.


काय आहे प्रकरण?

मुंबईत राहणाऱ्या मिताली यांचे पती महेंद्र कांबळे बेस्टमध्ये कर्मचारी होते. त्यांच्या निधनानंतर त्या दोन मुलांसोबत राहात आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांनी बेस्ट कार्यालयात खेटे मारून पतीची हक्काची १४ लाख रुपयांची रक्कम मिळवून ती बँकेत जमा केली. केली. मात्र काही महिन्यांनतर जेव्हा त्या बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांच्या खात्यात एक पैसाही शिल्लक नव्हता. हे पाहून त्यांना धक्काच बसला.

पतीच्या निधनानंतर बेस्टकडून मदत मिळावी यासाठी मिताली यांच्या दीरानेही प्रयत्न केले होते. पैसे मिळाल्यानंतर मदत करण्याच्या बहाण्याने त्याने दोघांचंही संयुक्त खातं उघडलं. त्याचा फायदा घेत मिताली यांच्या दीराने त्यांच्या नकळत चेकबुकद्वारे संपूर्ण रक्कम काढून घेतली. ही बाब दीराला विचारण्यासाठी त्या गेल्या, तेव्हा त्याने मिताली आणि त्यांच्या मुलाला चक्क हकलून दिलं.



असा मिळाला न्याय

बेस्ट प्रशासनाने दिलेला चेक महेंद्र कांबळे यांची पत्नी म्हणजेच मिताली यांच्या नावावर होता. पण मिताली आणि त्यांचा दिर यांचं बँकेत संयुक्त खातं असल्याने मिताली यांना न्याय मिळणं अवघड होतं. पण मिताली यांनी न घाबरता राज्य महिला आयोगाला पत्र लिहून न्याय देण्याची मागणी केली.

त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाईला सुरुवात करत मिताली यांच्या नातेवाईकांना हजर राहण्यास सांगितलं. त्यानंतर कारवाईला घाबरून त्यांच्या दिराने १५ दिवसांत कार्यालयात येऊन समुपदेशकांच्या समक्ष मिताली कांबळे यांना १२ लाख चेकच्या स्वरुपात परत केले. तर उर्वरित २ लाख लवकरच परत करणार असल्याचं आश्वासन दिलं.

आयोगातील कर्मचाऱ्यांनी हा विषय जलदगतीने मार्गी लावल्याने मिताली यांनी आयोगाचे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांचे आभार मानले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा