बेलगाम बाईकस्वारांना रोखणे हाच ध्यास!

MAHIM
बेलगाम बाईकस्वारांना रोखणे हाच ध्यास!
बेलगाम बाईकस्वारांना रोखणे हाच ध्यास!
बेलगाम बाईकस्वारांना रोखणे हाच ध्यास!
बेलगाम बाईकस्वारांना रोखणे हाच ध्यास!
See all
मुंबई  -  

कधीही न थांबणारं शहर अशी मुंबईची विशेष ओळख आहे. या महानगरात दिवस-रात्र वाहनांची वर्दळ सुरुच असते. खासकरुन रात्रीच्या वेळेस मुंबईच्या रस्त्यावर उतरतात हौशी वाहनचालक. मोकळ्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने कार, बाईक पळवताना आपण हौसेपोटी इतरांना कळत-नकळत त्रास देतोय, याचे त्यांना जराही शल्य नसते. गाड्यांचे सायलेन्सर बदलून वायू प्रदूषणच नव्हे, तर मुंबईच्या ध्वनी प्रदूषणातदेखील ही मंडळी भर घालत असतात. रात्रीच्या वेळेत मुंबईकरांना नाहक त्रास देणाऱ्या हौशी वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी माहीम पश्चिमेकडील 'प्रगती एएलएम'च्या सदस्यांनी पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. सध्या ते या विषयावर वाहतूक पोलिसांकडे पाठपुरवा करत आहेत.

महापालिकेच्या प्रगत परिसर व्यवस्थापना(एएलएम)चा मुख्य उद्देश परिसर स्वच्छ आणि सुंदर बनविणे हा असताना 'प्रगती एएलएम'चे सदस्य ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर एवढे आक्रमक का झाले? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. यामागचे कारण आहे, माहीम परिसरात रात्रीच्या वेळेत वेगाने बाईक चालविणाऱ्यांची वाढती संख्या. 'प्रगती एएलएम'चे सदस्य स्वत: या त्रासातून जात असून त्यांनी अनेक बाईकस्वारांचे अपघात होताना डोळ्यांनी बघितलेले आहेत. त्यामुळे वेगाची ही नशा कुणाच्या जिवावर बेतू नये, याच उद्देशातून या सदस्यांनी बेलगाम बाईकस्वारांना आळा घालण्याचे ठरवले आहे.

माहीम पश्चिमेकडील स्टेशन रोड ते लेडी जमशेद आणि वीर सावरकर मार्ग स्वच्छ, सुंदर बनवण्याच्या उद्देशाने 2000 साली 'प्रगती एएलएम' स्थापन करण्यात आले. त्यानंतर महापालिका प्रशासनाची मदत आणि लोकसहभागातून परिसरातील अनेक प्रश्न हाती घेण्यात आले. माहीम वाहतूक पोलिस चौकीला लागून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहनांचा ढीग अनेक वर्षांपासून साचला होता. याचा लेडी जमशेदजी आणि वीर सावरकर मार्गावरील वाहनांना अडथळा व्हायचा. हा वाहनांचा ढीग दूर करण्याचे यशस्वी काम 'प्रगती एएलएम'ने केले. माहीम जंक्शनच्या मोकळ्या जागेला डम्पिंग ग्राऊंडचे स्वरुप आले होते. ही जागा ताब्यात घेऊन तेथे उद्यान साकारण्यात आले. जवळच महापालिकेने बनवलेला भुयारी मार्ग तांत्रिक कारणांनी बंद होता. तो सुरू करण्यात आला, असे 'प्रगती एएलएम'चे सदस्य फारुक ढाला यांनी सांगितले.

'प्रगती एएलएम'ला परिसरातील अनेक समस्यांवर तोडगा काढण्यात यश आले. अपवाद फक्त रात्रीच्या वेळेस वेगाने बाईक चालवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांचा. यासाठी आम्ही सातत्याने वाहतूक पोलिसांच्या संपर्कात असून रात्री ठराविक वेळेत माहीमच्या रस्त्यावर घोळक्याने येणाऱ्या बाईकस्वारांची माहितीही आम्ही पोलिसांना देत असतो. या बाईकस्वारांवर कडक कारवाई व्हावी, अशी आमची मागणी असून लवकरच हा प्रश्नही निकाली निघेल अशी आम्हाला खात्री आहे, असे 'प्रगती एएलएम'चे इरफान मच्छिवाला म्हणाले.

माहीम परिसरात एखादा अपघात झाल्यास जवळ सरकारी रुग्णालय नाही. ट्रस्टचे एक रुग्णालय येथे होते. पण ते देखील काही वर्षांपासून बंद आहे. या भागाची जवळपास 3.5 लाख लोकसंख्या असून त्यात मध्यमवर्गीय कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर माहीम विभागात एक रुग्णालय सुरू करावे.
- फारुक ढाला, सदस्य, प्रगती एएलएम

Loading Comments

संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.