Advertisement

डॉल्फिनला वाचवण्यासाठी कांदळवन कक्षाचा पुढाकार

गेल्या काही महिन्यांत डॉल्फिन मृत पावण्याची संख्या वाढली आहे. ही बाब चिंताजनक असल्याचं म्हणत आता कांदळवन कक्षानं डॉल्फिनच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधून काढत डॉल्फिनला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं आहे.

डॉल्फिनला वाचवण्यासाठी कांदळवन कक्षाचा पुढाकार
SHARES

गेल्या काही महिन्यांत मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर मोठ्या संख्येनं मृत मासे त्यातही मृत डॉल्फिन आढळत आहेत. डॉल्फिनच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाल्यानं ते मरत असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे आता मुंबई कांदळवन कक्षानं पुढं येत मासे आणि डॉल्फिन वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.


मृत्यूचं नेमकं कारण?

मासे आणि डॉल्फिन नेमके का मारत आहेत? आणि त्यांना वाचवण्यासाठी काय करता येईल? याचा अभ्यास परळ पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मदतीनं करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई कांदळवन कक्षाचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली आहे.
वांद्रे बँड स्टँड, चिंबोरी, गिरगाव, जुहू, वर्सोवा आणि वसई अशा अनेक ठिकाणी मृत डॉल्फिन आढळले आहेत.

गेल्या काही महिन्यांत डॉल्फिन मृत पावण्याची संख्या वाढली आहे. ही बाब चिंताजनक असल्याचं म्हणत आता कांदळवन कक्षानं डॉल्फिनच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधून काढत डॉल्फिनला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं आहे.


सखोल अभ्यास करणार

8 ऑगस्ट आणि 18 ऑगस्टला मुंबईत जे डॉल्फिन आढळले त्या डॉल्फिनच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्यांना फुप्फुसाचा विकार, संसर्ग झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हा संसर्ग का होत आहे? तो होऊ नये म्हणून काय करता येईल? यासह आणखी खोलात जाऊन डॉल्फिनबरोबरच अन्य सागरी जीवांना काय धोका आहे? याचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. परळ पशुवैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच राज्याबाहेरच्या वा देशाबाहेरच्या संस्थांची मदतही यासाठी घेण्यात येणार आहे.


सागरी जीव वाचवण्यासाठी...

आता यापुढे मृत डॉल्फिन आढळल्यास त्या डॉल्फिनचं फुफ्फुस आणि इतर अवयव तपासणीसाठी बाहेरच्या संस्थांकडे पाठवण्यात येणार आहे. जेणेकरून डॉल्फिनच्या मृत्यूचं योग्य आणि नेमकं कारण काय? आहे हे समजून शकेल, असंही देशमुख यांनी सांगितलं आहे. तर सागरी जीव वाचवण्यासाठी कांदळवन कक्षाकडून पाच वर्षीय विशेष कार्यक्रमही तयार करण्यात येत असल्याचं समजत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा