Advertisement

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

मुंसळधार पावसामुळं राज्यात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली. कोकणातील महाड, चिपळूणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुराचा फटका बसला.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
SHARES

मुंसळधार पावसामुळं राज्यात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली. कोकणातील महाड, चिपळूणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुराचा फटका बसला. त्यामुळं या पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. अशातच आता गणेशोत्सव मंडळंही मदत करण्यासाठी पुढे सरसावली आहेत. मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू केला आहे. शिवाय, समाजमाध्यमांद्वारे नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना केले आहे. या आवाहनासही चांगला प्रतिसाद मिळत आहे. समितीच्या पुढाकाराने कोकण, कोल्हापूर, सांगली  व आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबीर राबवून तसेच औषधांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.

माटुंगा, किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळानं महाड आणि चिपळूण येथील काही गावांना भेट देऊन २१ हजार २०० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, एक टन फरसाण, १३ हजार बिस्कीटचे पुडे आदींचं वाटप केलं. तसंच, लवकरच या दानयज्ञाची दुसरी फेरी होणार असून त्यात आरोग्य चिकित्सेला महत्त्व दिलं जाणार आहे. पुरानंतर अरोग्याच्या समस्या भेडसावतात. निवाऱ्याच्या दृष्टीने चटई, चादरी, कपडेदेखील देण्याचा विचार केला जात आहे.

साथीचे रोग, त्वचारोग, महिलांशी संबंधित आजार यावरील मदतीकरिता किमान ८० डॉक्टर व त्यांचे सहाय्यक यांचे वैद्यकीय पथक मंगळवार, २७ जुलै रोजी श्री स्वामी समर्थ मठ, दादर येथून रवाना झाले. यासाठी माऊली चॅरिटेबल अ‍ॅन्ड मेडिकल ट्रस्ट-मुंबई. मातृभूमी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, केशवआळी गणेशोत्सव मंडळ, शिवसह्याद्री फाउंडेशन, मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ, पत्रकार आणि मित्र (अहिल्या विद्यामंदिर माजी विद्यार्थी), आचार्य अत्रे समिती मुंबई, स्व. सौ नयना चौधरी स्तनकर्क संभावना निवारण ट्रस्ट-मुंबई, शेगावचे गजानन महाराज पदयात्री सेवा संस्था, मुंबई-ठाणे आदी संस्था एकत्र आल्या आहेत.

चिंचपोकळीचा चिंतामणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळानेही मदतीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी कार्यकर्त्यांसह विभागातील लोकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने कपडे, सुका खाऊ अशा वस्तू देण्याच्या विचार सुरू आहे. तसेच तेथील स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा मानस आहे.



हेही वाचा -

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा