
राज्यातील परवानाधारक ऑटो-रिक्शा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे 2026 पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मंगळवारी (14 एप्रिल) केली. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर हा नियम लागू होणार असून, राज्यभरात याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
पण यानंतर मिरा-भाईंदरमध्ये मराठी सक्तीच्या नियमावरून तणाव वाढताना दिसत आहे. ऑटो-रिक्शा परवाना पडताळणीसाठी मराठी भाषा अनिवार्य केल्यानंतर विरोध तीव्र झाला आहे. एका RTO अधिकाऱ्याला धमकीचा फोन आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रसाद नलावडे या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्याला अज्ञात व्यक्तीकडून फोन करून मराठी सक्तीचा नियम मागे घेण्याची मागणी करण्यात आली. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचा संबंध बिश्नोई गँगशी असल्याचा दावा करत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर नलावडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर भूमिका घेत, संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकार कोणत्याही धमकीला बळी पडणार नाही आणि मराठी सक्तीचा नियम काटेकोरपणे राबवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून मिरा-भाईंदर परिसरात RTOकडून विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत आतापर्यंत 1,817 ऑटो-रिक्शा परवान्यांची पडताळणी करण्यात आली असून, त्यापैकी 111 चालकांना मराठी भाषा येत नसल्याचे आढळले आहे. या चालकांवर पुढील कारवाईबाबत अंतिम निर्णय अहवालानंतर घेतला जाणार आहे.
तपासणीदरम्यान चालकांच्या कागदपत्रांसह त्यांच्या मराठी ज्ञानाची चाचणी घेतली जात आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1969 मधील नियम 24 नुसार, चालकांना मराठी वाचता-लिहिता येणे आवश्यक आहे.
2019 मधील सुधारणांनंतर केवळ प्रमाणपत्र देण्याऐवजी प्रत्यक्ष लेखन आणि संभाषण चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे मिरा-भाईंदर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मराठी विरुद्ध अमराठी वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.
