Advertisement

महापौर राहणार जुन्या निवासस्थानातच!


महापौर राहणार जुन्या निवासस्थानातच!
SHARES

मुंबई - शिवाजीपार्क येथील महापौर निवासस्थान हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्यामुळे नवे महापौर राहायला जाणार कुठे असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, नव्या महापौरांचे निवासस्थान हे अद्याप निश्चित झालेले नसल्यामुळे अखेर नवनिर्वाचित महापौर हे शिवाजीपार्कमधीलच निवासस्थानात राहणार असल्याचे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे प्राचार्य विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड झाल्यानंतरही माजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापौर निवासस्थान सोडलेले नाही. महापौर निवासस्थान हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेत स्मारकाचे विधेयकही मंजूर केले. महापौर निवासस्थानाची जागा स्मारकासाठी विश्वस्त मंडळाला देण्याचा ठरावही महापालिका सभागृहात मंजूर झाला आहे. त्यामुळे महापौरांचे निवासस्थान हे भायखळा येथील राणीबागेतील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला असलेल्या जागेत स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या महापौरांचा मुक्काम हा राणीबागेतील बंगल्यात होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्याप्रमाणे प्रशासनाने राणीबागेतील बंगल्याचे नूतनीकरण करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. परंतु राणीबागेतील या बंगल्यातील महापौर निवासस्थानाला तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे आणि सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी विरोध करून महापालिका आयुक्तांचा बंगला हा महापौर निवासस्थान म्हणून दिले जावे, अशी मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे शिवाजीपार्क येथीलच महापौर निवासस्थानात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपण लवकरच या महापौर निवासस्थानात राहायला जाणार असल्याचे विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केले. महापलिका सभागृहनेते यशवंत जाधव यांनीही विश्वनाथ महाडेश्वर हे सध्याच्याच महापौर निवासस्थानात राहायला जाणार असून, नव्या महापौर निवासस्थानाचा शोध घेतला जाणार आहे. मात्र, नवे महापौर निवासस्थान कुठे असेल हे अद्यापही ठरलेले नाही. तूर्तास तरी नवनिर्वाचित महापौर हे शिवाजीपार्कमधीलच निवासस्थानात राहणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा