Advertisement

...तरीही महापालिका सभागृह नेतेपद रिक्तच

महापालिकेचे एप्रिल महिन्याचे सभागृह १० तारखेला असताना बुधवारी ४ मार्चला विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होते. त्यामुळे या सभागृहात सभागृहनेते पदाची घोषणा केली जाईल, अशी दाट शक्यता होती. परंतु प्रत्यक्षात सभागृहनेतेपदाची घोषणा करण्यात आली नाही. उलट सभागृह संपल्यानंतर महापौरांनी प्रसारमाध्यमांना विशाखा राऊत यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्याचं जाहीर केलं.

...तरीही महापालिका सभागृह नेतेपद रिक्तच
SHARES

मुंबई महापालिकेच्या शिवसेना गटनेतेपदी विशाखा राऊत यांची निवड करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात ही घोषणा सभागृहात न झाल्यामुळे पुढील १० एप्रिलपर्यंत सर्वांना अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे महापालिका सभागृहनेतेपदी निवड होऊनही हे पद सभागृहात घोषणा होईपर्यंत रिक्त राहणार आहे. महापालिकेच्या इतिहासात अशाप्रकारे सभागृहनेते पद रिक्त राहण्याची ही पहिलीच घटना आहे.

मुंबई महापालिकेचे सभागृहनेते यशवंत जाधव यांची स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे या रिक्तपदी ३ माजी महापौरांमध्ये स्पर्धा होती. परंतु यामध्ये दादरमधील शिवसेना नगरसेविका विशाखा राऊत यांनी बाजी मारली असून पक्षाने त्यांची महापालिका गटनेतेपदी निवड केली आहे.


सभागृहाबाहेर घोषणा

महापालिकेचे एप्रिल महिन्याचे सभागृह १० तारखेला असताना बुधवारी ४ एप्रिलला विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होते. त्यामुळे या सभागृहात सभागृहनेते पदाची घोषणा केली जाईल, अशी दाट शक्यता होती. परंतु प्रत्यक्षात सभागृहनेतेपदाची घोषणा करण्यात आली नाही. उलट सभागृह संपल्यानंतर महापौरांनी प्रसारमाध्यमांना विशाखा राऊत यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्याचं जाहीर केलं.


एक दिवस आधीच पत्र

पक्षाच्या गटनेतेपदाच्या निवडीबाबतचे पत्र पक्षाच्यावतीने उशिरा पोहोचल्याने त्यांची सभागृहात घोषणा होऊ शकली नाही, असं महापौरांनी स्पष्ट केलं. परंतु प्रत्यक्षात शिवसेना भवनमधून मंगळवारी संध्याकाळीच महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदाच्या निवडीबाबतचे पत्र महापौरांना प्राप्त झाल्याचं सूत्रांकडून समजत आहे. त्यामुळे एक दिवस आधी प्राप्त झालेल्या पत्राची अधिकृत घोषणा महापौरांनी सभागृहात न करता परस्पर बाहेर पत्रकार परिषदेत का केली? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


१० एप्रिलपर्यंत पहावी लागणार वाट

शिवसेनेने महापालिका पक्षाच्या गटनेतेपदी विशाखा राऊत यांची निवड केल्यानंतर हे पत्र महापालिका सभागृहात वाचून दाखवल्यावर सत्ताधारी पक्ष म्हणून त्यांची सभागृहनेतेपदी अधिकृत घोषणा झाली असती. परंतु पक्षाच्या गटनेतेपदी त्यांची अधिकृत घोषणा न झाल्यामुळे सभागृहनेतेपदी त्यांची अधिकृत निवड झालेली नाही. त्यामुळे पुढील १० एप्रिलपर्यंत सभागृहनेतेपद हे रिक्त राहणार आहे.


सभागृह नेत्याविना बैठक

विद्यमान सभागृहनेते यशवंत जाधव यांची निवड स्थायी समिती अध्यक्षपदी झाल्यानंतर ते या पदावर राहणार नाही. त्यामुळे येत्या शनिवारी होणाऱ्या स्थायी समितीची बैठक ही सभागृहनेत्याविना होणार आहे. विशाखा राऊत या स्थायी समिती सदस्य असल्या तरी त्यांना यशवंत जाधव बसत असलेल्या सभागृहनेते पदाच्या खुर्चीत बसता येणार नाही.

आजवरच्या इतिहासात अशाप्रकारे सभागृहनेते पदाची खुर्ची ही कधीही रिक्त राहिलेली नसून प्रथमच ती रिक्त असल्याचे काही महापालिकेच्या राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.


श्रद्धा जाधव यांचा पत्ता कापला

विशाखा राऊत यांच्याबरोबरच सलग ६ वेळा निवडून आलेल्या श्रद्धा जाधव या स्पर्धेत होत्या. सकाळपर्यंत त्यांचंही नाव आघाडीवर होतं. त्यामुळे काहींनी त्यांचं अभिनंदन केलं. श्रद्धा जाधव यांना गाफिल ठेवून विशाखा राऊत यांचं नाव पक्षाने जाहीर करत एकप्रकारे गनिमी कावाच खेळला असल्याचं म्हटलं जात आहे.


ही पदं वैधानिक

विरोधी पक्षनेते आणि सभागृहनेते पद ही वैधानिक असून त्यांची सभागृहात घोषणा होणे बंधनकारक आहे. इतर गटनेत्यांची निवड पक्षाने केल्यानंतर त्यांची सभागृहातील घोषणा ही केवळ औपचारिकता असते. त्यामुळे सभागृह नेतेपदाची घोषणा सभागृहात अध्यक्ष असलेल्या महापौरांकडून झाल्याशिवाय राऊत यांना पदाचा पदभार तांत्रिकदृष्ट्या स्वीकारता येणार नाही.  


हेही वाचा-

प्रतिक्षानगर पोटनिवडणूक: शिवसेना-काँग्रेसमध्ये सरळ लढत

सभागृह नेतेपदासाठी ३ माजी महापौरांमध्ये लढाई



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा