Advertisement

राज ठाकरेंची फेसबुकवर पहिली राजकीय भूमिका - बाबासाहेबांचे स्मारक नको, ग्रंथालय असावे!


राज ठाकरेंची फेसबुकवर पहिली राजकीय भूमिका - बाबासाहेबांचे स्मारक नको, ग्रंथालय असावे!
SHARES

महापुरुषांच्या स्मारकाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्याने मांडलेल्या भूमिकेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी आपले फेसबुक पेज सुरु केले. त्यात त्यांची पहिली राजकीय भूमिका प्रसिद्ध केली. त्यात त्यांनी 'निव्वळ राजकारणासाठी आणि दलित मते मिळावीत म्हणून, तसेच त्यांना खूष करण्यासाठी मुंबईतील जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्याचा खेळ झाला. तो सगळा प्रकार निवडणुकीतील मतांकडे बघून होता,' अशी भूमिका मांडली. त्यांचं स्मारक म्हणजे भव्य ग्रंथालय असावे असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना आता पुन्हा एकदा दलित जनता आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या पक्षांच्या नेत्यांच्या टीकेला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.


महाराजांचे स्मारक कशाला? गड किल्याचे संवर्धन करा!

राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत आपले मत व्यक्त केले. बाबासाहेबांचे स्मारक हे केंद्र असावे आणि जगभरातील अभ्यासकांना ज्ञान मिळवण्यासाठी या स्मारकाचा उपयोग व्हावा अशी इच्छाही ठाकरे यांनी आपल्या भूमिकेत व्यक्त केली आहे. आपली भूमिका अधिक स्पष्टरीत्या अधोरेखित करताना त्यांनी महापुरुषांंच्या स्मारकाच्या चित्रांच्या लिंक फेसबुक पेजवर दिल्या आहेत. महापुरुषांच्या स्मारकांविषयी माझ्या काही कल्पना आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मागे बोललो होतो की महाराजांचे खरे स्मारक हे त्यांचे गड किल्ले आहेत, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यातून आत्ताच्या आणि येणाऱ्या पिढयांना स्फूर्ती मिळणं हा त्या स्मारकामागचा उद्देश आहे.


दलितांना खुश करण्यासाठी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाविषयी माझं असंच म्हणणं आहे. निव्वळ राजकारणासाठी आणि दलित मतं मिळावीत म्हणून, केवळ त्यांना खूष करण्यासाठी मुंबईतील जागा डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्याचा खेळ झाला. तो सगळा प्रकार फक्त निवडणुकीतील मतांकडे बघून होता.


स्मारक हे ज्ञानाचे केंद्र असावे

वास्तविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक ज्ञानी माणूस, आपल्या अफाट वाचनातून, अभ्यासातून त्यांनी आपल्या देशात समतेचा एक मोठा विचार दिला. शिका, लढा आणि संघटित व्हा असा संदेश दिला. यांत 'शिका' हे पहिलं आहे जे आपल्याला पुस्तकातूनच मिळू शकतं. आपल्या सर्वांना त्यांचं पुस्तकप्रेम माहित असेलच. त्यामुळे त्यांचं स्मारक हे ज्ञानाचं केंद्र असावं, तिथे जगभरातले अभ्यासक येऊन त्यांनी त्या पुस्तकांचा लाभ घ्यावा, ज्ञान मिळवावं अशी माझी इच्छा आहे. यातूनच जगाला समजेल की पुस्तकांवर प्रेम करणारे आणि ज्ञानातून समाजाला दिशा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशात होऊन गेले.


स्मारकाऐवजी भव्य ग्रंथालय असावे

त्यांचं स्मारक म्हणजे भव्य ग्रंथालय असावे, जिथे गेल्यावर माणसाला वाचनाची, अभ्यासाची प्रेरणा मिळावी. महापुरुषाच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच त्या स्मारकाचं स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर) असावे. भव्यता असावी, त्या वास्तूला एक सौंदर्यदृष्टीचा स्पर्श असावा, माझ्या महाराष्ट्राविषयी आणि महापुरुषांविषयी असा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी आपल्या या लेखात म्हटले आहे.


वादाची ठिणगी पडण्याची शक्यता

याआधीही ठाकरे यांनी ही भूमिका व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांना दलित समाज आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. राज ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भूमिकेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या स्मारकांसंदर्भात आपली स्पष्ट मते व्यक्त केली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दलित समाज आणि राज ठाकरे यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

आलं, गुगलचं 'मोबाईल वाॅलेट' अॅप

पेटीएमची पेमेंट बँक सुरु, 4 टक्के मिळणार व्याज


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा