Advertisement

मनसेचा पुन्हा अल्टीमेटम! फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा

मुंबईत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असतानाही दादरमधील फेरीवाले केशवसूत उड्डाणपुलाखाली बसून असल्याचा व्हिडिओ मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी नुकताच फेसबुक पेजवर टाकला होता. हा व्हिडिओ टाकतानाच या फेरीवाल्यांना हटवलं नाही, तर जनता विभाग कार्यालयात येऊन बसेल, असा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर गुरूवारी जी/उत्तर विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांच्या कार्यालयात बैठक झाली.

मनसेचा पुन्हा अल्टीमेटम! फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा
SHARES

दादर रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाले पुन्हा बसू लागले आहेत. या फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. त्यावर येत्या गुरुवारपासून स्थानकाच्या १५० मीटर परिसरातील रस्ते मोकळे न दिसल्यास जो कोणी संबंधित निरीक्षक ड्युटीवर असेल त्याला निलंबित करण्यात येईल, असं आश्वासन जी/ उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिलं आहे. एवढंच नव्हे, तर कारवाई दरम्यान इमारतीच्या आवारात जाऊन समान लपवून ठेवत असल्याने तो मालही जप्त करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्तांनी दिल्या आहेत.


इशाऱ्यानंतर जाग

मुंबईत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असतानाही दादरमधील फेरीवाले केशवसूत उड्डाणपुलाखाली बसून असल्याचा व्हिडिओ मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी नुकताच फेसबुक पेजवर टाकला होता. हा व्हिडिओ टाकतानाच या फेरीवाल्यांना हटवलं नाही, तर जनता विभाग कार्यालयात येऊन बसेल, असा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर गुरूवारी जी/उत्तर विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांच्या कार्यालयात बैठक झाली.


फेरीवाले बसतातच कसे?

या बैठकीत संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी तसंच मनसेचे पदाधिकारी, आयडियल गल्ली, सुविधा गल्ली, डिसिल्वा रोड गल्ली आणि आसपासचे रहिवासी उपस्थित होते. दादर आणि शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, परवाना निरीक्षक अनिल सिंह आदी उपस्थित होते. यावेळी देशपांडे यांनी कारवाई सुरू असताना फेरीवाले बसतातच कसे? असा सवाल करून पकडलेला माल गोदामामध्ये न पाठवता मध्येच चिरीमिरी घेऊन सोडून दिला जात असल्याचा आरोप महापालिका अधिकाऱ्यांवर केला.


लपवलेला माल कसा जप्त करायचा?

ही कारवाई सुरू असताना, फेरीवाले थेट इमारतीच्या आवारात समान आणून ठेवतात. त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होते, अशी कैफियतही रहिवाशांनी मांडली. यावर रस्त्यावर असलेल्या फेरीवाल्यांवर महापालिका कारवाई करू शकते. पण इमारतीत लपवलेला माल जप्त केला जाऊ शकत नाही, असं महापलिकेच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं. त्यावर देशपांडे, धुरी यांच्यासह रहिवासी संतप्त झाले. त्यानंतर अखेर सहायक आयुक्तांनी, कोणी फेरीवाला जर इमारतीत जाऊन सामान लपवत असेल, तर तेही जप्त करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.


आठवडाभराची मुदत

यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी येत्या गुरुवारपर्यंत मुदत मागून घेत ही कारवाई कडक करण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली. पुढील गुरूवारनंतरही चित्र कायम दिसल्यास जो कुणी अधिकारी ड्युटीवर असेल त्याला निलंबित केलं जाईल, असं आश्वासन दिल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही गुरुवारपर्यंत वाट पाहू आणि त्यानंतर पुन्हा एकदा मनसे स्टाईल दाखवू. सोबतच रहिवाशांची मागणी महापालिकेने मान्य केली असून फेरीवाल्यांना आता इमारतीतही लपायला जागा मिळणार नाही, असं त्यांनी सांगितलं.



हेही वाचा-

फेरीवाले पुन्हा रस्त्यावर! महापालिका, पोलिसांचा धाक झाला कमी!!

तर, मातोश्री समोरही फेरीवाले बसवू, नितेश राणे यांचा इशारा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा