मुंबईसह आसपासच्या परिसरात मागील काही दिवसांपासून सतत उकाडा, पाऊस आणि थंडी असं वातावरण पाहायला मिळत आहे. या विचित्र वातावरणामुळं ताप, डोकेदुखी, सर्दी हा संसर्गाचा त्रास वाढला आहे. अनेक मुंबईकर संसर्गजन्य तापामुळं ग्रस्त आहेत, तर काहीजण मलेरियानं ग्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादर्भाव व त्याच्या भीतीनं अनेकांना हा कोरोनाचा ताप असल्याची भीती सातवत आहे.
मागील महिन्याच्या तुलनेत तापाच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण थोडे वाढले असले तरी या रुग्णांमधील बऱ्याच रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाही. त्यांना व्हायरल तापाचा त्रास असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही केल्या जात आहेत. योग्यवेळी वैद्यकीय उपचार सुरू केल्यानंतर हा ताप उतरत आहे.
हवामानातील बदलामुळं संसर्गजन्य आजार होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं सर्दी, खोकला, तापाची लक्षणं जाणवल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मुंबईतील काही सोसायट्यांमध्ये कोरोना रुग्णांना अजूनही सहकार्य केलं जात नाही. अशा कुटुंबानं घरामध्ये विलगीकरण केले असले तरीही त्यांना महिनाभर घरात राहण्याची सक्ती केली जाते.
प्रत्येक ताप हा कोरोनाचाच नसतो, मात्र त्याची वैद्यकीय खातरमजा करायला हवी, हा आग्रह पालिकेकडून सातत्याने व्यक्त केला जात आहे. कोरोनाच्या चाचण्या आता सर्वत्र उपलब्ध आहेत. तसंच, अॅण्टीजेन चाचण्यांचे अहवालही अर्धा तासात येतात. त्यामुळं तापाचं निदान योग्यवेळी होणं गरजेचं असल्याचं आवाहन महापालिका प्रशासनाकडून सातत्यानं केलं जात आहे.
हेही वाचा -
मुंबईत 'या' तारखेपासून धावणार मेट्रो
मेट्रोसोबत मोनोरेल ही प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार