राज्यात 37 केंद्रांवर होणार परीक्षा

  Mumbai
  राज्यात 37 केंद्रांवर होणार परीक्षा
  मुंबई  -  

  मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उप अधीक्षक, वर्ग -1 आणि वर्ग-2 च्या विविध पदांसाठी राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवारी 2 एप्रिलला राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

  या परीक्षेला जवळपास 1 लाख 98 हजार उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 असा या परिक्षेचा वेळ आहे. प्रत्येकी दोन तास दोन पेपर्स अशा या परीक्षेची तयारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्व जिल्हा प्रशासनांच्या मदतीने केली आहे.

  सर्व उमेदवारांना प्रवेशपत्रे पाठविण्यात आली असून, जवळपास 10 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक अशा कामांसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

  जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली या परीक्षा होणार असून, आयोगातून विशेष निरीक्षक/ भरारी पथके पाठवली जाण्याचीही शक्यता आहे, अशी माहिती आयोगातर्फे देण्यात आली आहे.

  उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी मोबाईल फोन किंवा कोणतेही संपर्क उपकरण बाळगणे, वापरणे किंवा तसा प्रयत्न करणे हा गुन्हा असून असा प्रकार किंवा प्रयत्न आढळल्यास, उमेदवारी रद्द केली जाईल. असं आढळल्यास आयोगाच्या भविष्यातील परीक्षांसाठी बंदी घालणे आणि पोलिसात फौजदारी गुन्हा नोंदविणे अशी कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.