15 जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकांपूर्वी मुंबईत 11 लाखांहून अधिक संशयित “डुप्लिकेट” किंवा “दुबार” मतदारांची नोंद आढळून आली आहे. उर्वरित सुमारे 4 लाख संशयित डुप्लिकेट मतदार हे इतर 28 महापालिकांमध्ये विखुरलेले आहेत.
एचटी (HT) च्या रिपोर्टनुसार, नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व महापालिकांमधील एकूण संशयित डुप्लिकेट मतदारांपैकी 70 टक्क्यांहून अधिक केवळ मुंबईत आहेत. विशेष म्हणजे, एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत मुंबईचा वाटा फक्त सुमारे 29 टक्के इतकाच आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकांमध्ये सुमारे 1 कोटी 3 लाख मतदार आहेत, तर 29 महापालिकांमधील एकूण मतदारसंख्या 3 कोटी 48 लाख आहे. ही आकडेवारी पाहता, मुंबईबाहेरील महापालिकांनी संशयित डुप्लिकेट मतदारांची संख्या कमी दाखवली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरून मुंबईबाहेरील भागांमध्ये डुप्लिकेशन प्रक्रियेत त्रुटी असल्याचे स्पष्ट होते.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर डुप्लिकेट मतदार आढळण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात मोठी स्थलांतरित (floating) लोकसंख्या, अधिक वॉर्ड्स आणि मोठी मतदारसंख्या यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या एका संयुक्त बैठकीत निवडणूक आयोगाने (ECI) डुप्लिकेट मतदार ओळखण्यासाठी आणि पडताळणीसाठी बीएमसीने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
बीएमसीने स्वतःच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने संपूर्ण शहरात डी-डुप्लिकेशन मोहीम राबवली. या प्रणालीत मतदारांचे फोटो वापरून डुप्लिकेट नोंदी ओळखल्या गेल्या. डुप्लिकेट नोंद आढळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी तैनात करून संबंधित मतदारांशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना एकच मतदान केंद्र निवडण्यास सांगण्यात आले.
बीएमसी आयुक्त भूषण गगराणी, जे गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांवेळी जिल्हा निवडणूक अधिकारीही होते, सध्या महापालिका निवडणुकांचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे बीएमसीला विधानसभा आणि महापालिका या दोन्ही निवडणुकांचा मतदार डेटा उपलब्ध झाला.
अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे घरोघरी जाऊन पडताळणी करणे सोपे झाले आणि मतदारांकडून लेखी हमीपत्र (undertaking) घेणे शक्य झाले.
इतर महापालिकांमध्ये मात्र आयुक्तांनी विधानसभा निवडणुका हाताळणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधला नाही आणि त्यांना अशा प्रकारचा डेटा उपलब्ध नव्हता.
सूत्रांच्या माहितीनुसार, मतदार यादी दोन गटांत विभागण्यात आली होती. पहिल्या गटात एकाच वॉर्डमधील डुप्लिकेट नोंदी होत्या, तर दुसऱ्या गटात वेगवेगळ्या वॉर्डमधील डुप्लिकेट नोंदींचा समावेश होता.
वेगवेगळ्या वॉर्डमधील डुप्लिकेट मतदार ओळखण्यासाठी बीएमसीने समान दिसणाऱ्या छायाचित्रांची तुलना करणारे सॉफ्टवेअर विकसित केले. या पद्धतीमुळे डुप्लिकेट मतदार ओळखण्याची प्रक्रिया अधिक वेगवान झाली.
परिणामी, 11 लाख संशयित डुप्लिकेट मतदारांपैकी 60 टक्क्यांहून अधिक मतदारांशी बीएमसीने आधीच संपर्क साधून त्यांनी कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचे याची खात्री घेतली आहे.
हेही वाचा
