Advertisement

स्वयंपुनर्विकासाला चालना! बाेरीवलीतील सोसायटीला ११० कोटीचं कर्ज

स्वयंपुनर्विकासासाठी १०० कोटींहून अधिक खर्च अपेक्षित असल्याने एकाही बँकेकडून शैलेश विहार सोसायटीला कर्ज मिळत नव्हतं. पण ही अडचण सोडवली ती मुंबै बँकेने या बँकेने सोसायटीला थोडथोडकं नव्हे, तर ११० कोटींचं कर्ज दिलं.

स्वयंपुनर्विकासाला चालना! बाेरीवलीतील सोसायटीला ११० कोटीचं कर्ज
SHARES

बोरीवलीतील भगवती रुग्णालयाजवळील शैलेश विहार सोसायटी गेल्या ७ वर्षांपासून पुनर्विकासासाठी प्रयत्न करत आहे. अनेक बिल्डर आले आणि गेले, पण पुनर्विकास काही मार्गी लागेना. त्यामुळं सोसायटीनं स्वत: अर्थात स्वयंपुनर्विकासाचा मार्ग निवडला. पण हा मार्गही सोसायटीसाठी खडतर बनला. कारण त्यासाठी सोसायटीपुढे पैशांची मोठी अडचण उभी राहिली. या पुनर्विकासासाठी १०० कोटींहून अधिक खर्च अपेक्षित असल्याने एकाही बँकेकडून सोसायटीला कर्ज मिळत नव्हतं. पण ही अडचण सोडवली ती मुंबै बँकेने या बँकेने सोसायटीला थोडथोडकं नव्हे, तर ११० कोटींचं कर्ज दिलं.


'असं' मिळालं कर्ज

काही महिन्यांपूर्वी शैलेश विहार सोसायटीला म्हाडा आणि मुंबै बँकेच्या गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास अभियानाबद्दल समजलं. त्यानुसार त्यांनी मुंबै बँकेशी संपर्क साधला. बँकेने या प्रोजेक्टचा अभ्यास करून सोसायटीला स्वयंपुनर्विकासासाठी ११० कोटीचं कर्ज मंजूर केलं. ही रक्कम सोसायटीला टप्प्याटप्प्यात मिळणार आहे. स्वयंपुनर्विकासासाठी एखाद्या सोसायटीला बँकेने ११० कोटीचं कर्ज देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं म्हटलं जात आहे.


कसा असेल प्रोजेक्ट?

शैलेश विहार सोसायटीत एकूण ८६ फ्लॅट आहेत. याआधी आलेल्या बिल्डरांनी सोसायटीला ७०० चौ. फुटांपर्यंतचंच घर देऊ केलं होतं. आता स्वयंपुनर्विकासात रहिवाशांना थेट ९५० चौ. फुटांपर्यंतची घरं उपलब्ध होणार आहेत. तर विक्रीसाठीही मोठ्या प्रमाणावर चटई क्षेत्र उपलब्ध होणार आहे. त्यावर निवासी बांधकामासह अनिवासी बांधकामही केलं जाणार असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष रोहित शेट्टी यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.


इमारत मेंटनन्स फ्री

या निवासी आणि निवासी गाळ्यांच्या विक्रीतून सोसायटी कर्ज फेडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे विक्रीच्या रक्कमेतून सुमारे ३५ कोटी शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे सोसायटीचा देखभालीची डोकेदुखी दूर होणार आहे. म्हणजेच पुनर्विकासातील इमारती मेंटनन्स फ्री होणार असल्याचंही शेट्टी यांनी सांगितलं.

एखाद्या सोसायटीला स्वयंपुनर्विकासासाठी इतकं मोठं कर्ज मिळणं हे मुंबईत पहिल्यांदाच घडत आहे. आमचा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास सोसायट्यांना कर्ज मिळणं सोप होणार आहे. केवळ आर्थिक कारणांमुळे रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागून स्वयंपुनर्विकासाला चालना मिळणार असल्याची आशा आता यानिमित्तानं व्यक्त होत आहे. त्यातही स्वयंपुनर्विकासातून मोठी घरं मिळत असून कोट्यवधींची बचत होत असल्यानं इतर सोसायट्याही नक्कीच स्वयंपुनर्विकासासाठी पुढे येतील, असा विश्वासही शेट्टी यांनी व्यक्त केला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा