
मालाड (Malad) पूर्व भागात उभारलेल्या लोखंडी बॅरिकेड कोसळून 12 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जे कुमार कंपनीच्या सुपरवायझरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोशी पोलिस (Dindoshi Police) यांनी 20 एप्रिल रोजी एफआयआर नोंदवला.
पोलिसांच्या (police) माहितीनुसार, गोरेगाव-मुलुंड (Goregaon-Mulund) लिंक रोडचे काम सुरू असून कामाच्या ठिकाणी यंत्रसामग्रीभोवती गोलाकार लोखंडी बॅरिकेड उभारण्यात आले होते. मात्र, त्यापैकी एक बॅरिकेड अचानक कोसळून 12 वर्षीय त्रिशा हिला गंभीर दुखापत झाली.
तक्रारदार ऋतिका महाडिक (26) या आपल्या कुटुंबासह मालाड पूर्वेतील पिंपरीपाडा येथे राहतात. सुट्टीच्या काळात त्या आणि त्यांच्या बहिणी रात्री फेरफटका मारण्यासाठी घराजवळील रस्त्यावर जात असत. या रस्त्यावर वाहतूक बंद असून स्थानिक नागरिक वापरत होते. त्या ठिकाणी 15 ते 20 लोखंडी बॅरिकेड निष्काळजीपणे उभारले होते.
16 एप्रिल रोजी रात्री सुमारे 10 वाजता ऋतिकाच्या चार बहिणी फिरायला गेल्या असताना 12 वर्षीय त्रिशा जवळच खेळत होती. सुमारे 10.45 वाजण्याच्या सुमारास अचानक एक बॅरिकेड कोसळले आणि तिच्या चेहऱ्यावर आणि दोन्ही मांडींवर गंभीर दुखापत झाली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुरुवातीला तिला राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी गोरेगाव पूर्व येथील कांची हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. 19 एप्रिल रोजी केलेल्या स्कॅन आणि एमआरए अहवालात दोन्ही मांडींच्या सांध्यांना फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 125(अ), 125(ब) (जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षिततेस धोका निर्माण करणे) आणि कलम 289 (यंत्रसामग्रीबाबत निष्काळजीपणा) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून संबंधित सुपरवायझरवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित कंपनीवर पुन्हा एकदा सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. 15 एप्रिल रोजी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील Asian Heart Hospital जवळ मेट्रो लाईन 2B च्या कामादरम्यान 140 मेट्रिक टन बीम उचलताना क्रेन बिघाडामुळे कलंडली होती. या घटनेमुळे अनेक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. एमएमआरडीएकडून कंपनीला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
तसेच 8 एप्रिल रोजी ठाण्यातील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील कोपरी उड्डाणपुलावरही क्रेन उलटण्याची घटना घडली होती. यापूर्वी 2025 मध्ये मेट्रो लाईन 5 आणि लाईन 9 च्या कामादरम्यानही अशाच प्रकारच्या घटना घडल्या असून कंपनीच्या सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हेही वाचा
