Advertisement

मुंबई विद्यापीठाचा बॉक्सिंग संघ करतोय रेल्वेतील शौचालयाजवळ बसून प्रवास!


मुंबई विद्यापीठाचा बॉक्सिंग संघ करतोय रेल्वेतील शौचालयाजवळ बसून प्रवास!
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईमुळे आधीच विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. असे असताना आता पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. मुंबई विद्यापीठातून बॉक्सिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंजाबमध्ये जात असलेल्या बॉक्सिंग संघाचे रेल्वे तिकीटच कन्फर्म झालेले नाही. त्यामुळे त्यांना चक्क रेल्वेमधील शौचालयाच्या शेजारी बसून प्रवास  करावे लागत आहे.


IMG-20171116-WA0051.jpg


18 नोव्हेंबरला सुरू होणार स्पर्धा

मुंबई विद्यापीठातील टीवायचे निकाल उशिरा लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. पण आता चॅम्पियन बॉक्सर यांच्याकडेही मुंबई विद्यापीठाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांच्यावर शौचालयाच्या बाहेर बसून प्रवास करण्याची वेळ आली आहे.


IMG-20171116-WA0022.jpg

पंजाब येथे 18 ते 25 नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठातले 9 खेळाडू आणि 1 प्रशिक्षक असे एकूण 10 जण पश्चिम रेल्वेच्या एक्स्प्रेसने पंजाबला जाण्यासाठी प्रवास करत आहेत. पण विद्यापीठाकडून काढण्यात आलेल्या तिकिटांचे आसन क्रमांकच कन्फर्म नसल्यामुळे त्यांना रेल्वेतील शौचालयाच्या बाहेर बसून प्रवास करावा लागत आहे. आता ही स्पर्धा संपल्यावर 28 नोव्हेंबरनंतर मुलींचा संघ देखील पंजाबला रवाना होणार आहे.


IMG-20171116-WA0052.jpg


आम्हाला आधीच सांगण्यात आले होते की, कोणाचीही तिकीट कन्फर्म नाही. पण स्पर्धेसाठी जायचे असल्यामुळे आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. म्हणून आम्ही येथे बसून प्रवास करत आहोत. पण नेहमी असे होत असते. तिकीट उशिराने काढल्यामुळे बऱ्याच खेळाडूंवर अशी वेळ येते. 

- सौरभ लोनेकर, मुंबई विद्यापीठाचा बॉक्सर


मुंबई विद्यापीठाच्या विजेत्या खेळाडूंवर आलेली ही वेळ खूप निंदनीय आहे. विद्यापीठ खेळाडूंकडे पदकाची अपेक्षा करते, पण काही सोयी-सुविधा उपलब्ध करून देत नाही. रेल्वेत शौचालयाच्या बाहेर खेळाडू अडचणीत बसले आहेत. जर काही दुखापत झाली, तर याचा फटका मुंबई संघाला रिंगमध्ये बसू शकतो. हा संघ अत्यंत मेहनत करून या स्पर्धेसाठी जात आहे. त्यांची काळजी करणे विद्यापीठाचे काम आहे. 

- सम्राट इंगळे, माजी बॉक्सर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा