वानखेडे मैदान परिसरात असलेल्या गरवारे क्लब हाऊसमध्ये रविवारी जिन्यावरून पडून तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हृद्यांश राठोड असे मृत मुलाचे नाव असून प्राथमिक चौकशीत हा अपघात असल्याने पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
गरवारे क्लब हाऊस येथे सहाव्या मजल्यावरील गच्चीमध्ये गरवारे क्लबच्या सदस्यांसाठी फुटबॉल वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्याकरिता सोय करण्यात आली होती. यासाठी अवनिश राठोड हे त्यांची पत्नी व मुलासह तेथे आले होते. त्यांचा मुलगा हृद्यांश रात्री पावणेअकराच्या सुमारास दुसऱ्या एका मुलासह पाचव्या मजल्यावर लघुशंकेसाठी खाली आला.
काही वेळानंतर पाचव्या मजल्यावरून पुन्हा वर जात असताना तो पडला. बेशुद्धावस्थेतील हृद्यांशला तत्काळ बॉम्बे रुग्णालयात नेण्यात आले. बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास हृद्यांशचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या वडिलांचा जबाब नोंदवून अकस्मात मृत्यूची नोंद केली.
हेही वाचा