Advertisement

शाब्बास मुंबईकर ! यंदाच्या दिवाळीत ध्वनिप्रदूषण कमी


शाब्बास मुंबईकर ! यंदाच्या दिवाळीत ध्वनिप्रदूषण कमी
SHARES

दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे दरवर्षी मुंबईत ध्वनी प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे आपण ऐकले असाल. पण यावर्षी मात्र हे प्रमाण कमी झाले आहे. कारण ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने प्रसिद्ध केलेल्या ध्वनिप्रदूषण अहवालानुसार, यंदाची दिवाळी ही ध्वनीप्रदूषण कमी करणारी दिवाळी ठरली आहे. यंदा मुंबईकरांनी आवाजाचे फटाके न फोडण्याकडे आपली पसंती दाखवली. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत मुंबईत होणाऱ्या ध्वनिप्रदूषणात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा घट झाल्याचं समोर आलं आहे.


केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत दिवाळीदरम्यान मुंबईत होणारे ध्वनिप्रदूषण कमी झाल्याचं निदर्शनास आलं आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत आठ ठिकाणी करण्यात आलेल्या आवाजाच्या पातळीचा निर्देशांक यंदा कमी नोंदवला गेला आहे.


या भागात आवाजाची पातळी एवढीच असावी -

ध्वनिप्रदूषण अधिनियम २००० मधील तरतुदीनुसार, वेगवेगळ्या ठिकाणी आवाजाच्या पातळीकरता काही मर्यादा घालून देण्यात आल्या. यामध्येही दिवसा आणि रात्री ही पातळी केवढ्या डेसिबलपर्यंत असावी, याचीही मर्यादा आहे.


आवाजाची पातळीची मर्यादा

  • औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डीबी आणि रात्री 70 डीबी
  • व्यावसायिक क्षेत्रात दिवसा 65, रात्री 55
  • रहिवासी क्षेत्रात दिवसा 55, रात्री 45
  • शांतता क्षेत्रात दिवसा 50 आणि रात्री 40 डेसिबल


या मर्यादित पातळीचे उल्लंघन झाल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई केली जाते. राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाप्रमाणे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळदेखील मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फटाक्यांमुळे होणाऱ्या आवाजाच्या पातळीची मोजणी करते. मुंबईत या मंडळातर्फे 19 ऑक्टोबरला आवाजाच्या पातळीची मोजणी करण्यात आली. मुंबईतील औद्यागिक, व्यावसायिक आणि शांतता क्षेत्र मिळून आठ ठिकाणी ही मोजणी करण्यात आली.


या ठिकाणच्या आवाजाची केली मोजणी

  • वांद्रे
  • अॅकवर्थ रुग्णालय (वडाळा)
  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय (सायन)
  • कांदिवली
  • पवई, चेंबूर, अंधेरी
  • अॅतम्बेसिडर हॉटेल (चर्चगेट)

या ठिकाणी ध्वनिप्रदूषण अधिनियमानुसार दिवस आणि रात्री अशा दोन्ही वेळेतील आवाजाची पातळी नोंदवली गेली. अहवालानुसार, या सर्व ठिकाणी सकाळच्या वेळेतील ध्वनिप्रदूषणाची पातळी दोन वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.रात्रीच्या वेळी आठपैकी दोन ठिकाणी आवाज वाढल्याचं अहवालातील निर्देशांकांतून समोर आलं आहे.


कांदिवलीत आवाजाची पातळी 57

कांदिवली येथील औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या मोजणीत आवाजाची पातळी 57 डेसिबल नोंदवली गेली. गेल्या वर्षी याच ठिकाणी 53 डेसिबल आवाज नोंदवला गेला होता. मात्र, आवाजाचा हा निर्देशांक औद्योगिक क्षेत्रात रात्रीच्या वेळी आखून देण्यात आलेल्या 70 डेसिबल मर्यादेपेक्षा कमी आहे.


वांद्र्यात 72 डेसिबल, मर्यादेचं उल्लंघन

वांद्रे येथील व्यावसायिक कार्यालयांबाहेर आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आलं आहे. या ठिकाणी 72 डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद व्यावसायिक क्षेत्रासाठी रात्रीच्या वेळी घालून दिलेल्या 55 डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त आहे.

पण, एकूणच दिवाळीदरम्यान मुंबईतील सर्वसाधारण ध्वनिप्रदूषणात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत घट झाल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. त्यामुळे जर यंदाच्या दिवाळीत ध्वनीप्रदूषण कमी झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.



हेही वाचा - 

यंदाच्या दिवाळीत ध्वनी प्रदूषणाला आवर, पण हवा प्रदूषण कायम!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा