Advertisement

विविध मागण्यांसाठी नायरमधील कर्मचारी १ जूनला उपोषणावर

म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली सर्व संवर्गातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

विविध मागण्यांसाठी नायरमधील कर्मचारी १ जूनला उपोषणावर
SHARES

विविध मागण्यांसाठी नायरमधील कर्मचारी १ जून रोजी उपोषण करणार आहेत. 

मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय व दंत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न, मागण्या व अडचणींबाबत अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे व सबंधित अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येत नसल्यामुळे रुग्णालयात नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून मागण्यांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संवर्गातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली १ जून रोजी सकाळच्या पाळीपासून नैमित्तिक रजा घेऊन उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णालयातील व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आस्थापनेवरील चतुर्थश्रेणी कामगारांच्या १३९ पदांपैकी सुमारे ५१ पदे रिक्त आहेत. जवळपास ४० टक्के पदे रिक्त असतानाही रुग्णसेवेसाठी असलेल्या चतुर्थश्रेणी कामगारांना अधिष्ठाता कार्यालय, आस्थापना विभाग व पदाव्यतिरिक्त अन्य कामे दिली जात आहेत. अशा कामगारांना त्यांच्या पदानुरुप काम देण्याचे आदेश अधिष्ठात्यांनी दिले आहेत.

सफाई कामगारांची सर्व २६ पदे भरलेली असताना वसतिगृहाचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे. कंत्राटदाराला मदत करण्यासाठी प्रशासन सफाई कामगारांना अन्य कामे देत आहे. १२ कंत्राटी कामगारांना चतुर्थश्रेणी कामगारांच्या रिक्त पदांवर घेतले आहे. मात्र त्यांना त्यांच्या पदाचे काम न देता अन्य काम दिले आहे, असा आरोप कामगारांकडून करण्यात आला आहे.


डॉक्टर्स, परिचारिका व अन्य महिला कर्मचाऱ्यांची संयुक्त खोली व स्वच्छतागृहाच्या सफाईसाठी स्वतंत्र महिला सफाई कामगार देणे आवश्यक आहे. मात्र पुरुष सफाई कामगारांकडून ही कामे करून घेण्यात येत आहेत. 



हेही वाचा

शिवडी क्षयरोग रुग्णालयातील रुग्णांच्या आहारात मांसाहारी पदार्थांचा समावेश

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा