कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 डब्यांचा नवीन रेक सुरू करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असून लवकरच तो सेवेत दाखल केला जाणार आहे. मुंबई-गोवा मार्गावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि वेगवान रेल्वे सेवांपैकी एक म्हणून वंदे भारत एक्सप्रेसने अल्पावधीतच प्रवाशांची पसंती मिळवली आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात 22229 आणि 22230 या क्रमांकाच्या गाड्यांमधून एकूण 58,394 प्रवाशांनी प्रवास केला. तर उपलब्ध आसनक्षमता 55,120 इतकी होती. त्यामुळे 2025 मध्ये सरासरी प्रवासी भरणा 105 टक्के होता, जो 2026 मध्ये जवळपास 106 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
विशेष म्हणजे, मे महिन्यात मडगाव-मुंबई सेवेत सर्वाधिक 109.33 टक्के प्रवासी भरणा नोंदवण्यात आला. उन्हाळी सुट्ट्या आणि पर्यटन हंगामामुळे या मार्गावरील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.
या निर्णयासोबतच कोकण रेल्वेच्या बहुप्रतीक्षित ट्रॅक डबलिंग (दुहेरी मार्ग) प्रकल्पालाही गती देण्यात आली आहे. सुमारे 263 किलोमीटरच्या या प्रकल्पात तीन नवीन स्थानके, अतिरिक्त लूप लाईन्स, आधुनिक सिग्नल यंत्रणा आणि प्रवासी तसेच मालवाहतुकीसाठी सुधारित सुविधा उभारल्या जाणार आहेत.
सध्या एकेरी मार्गामुळे गाड्यांना क्रॉसिंगसाठी थांबावे लागते, त्यामुळे वेळापत्रकावर परिणाम होतो. दुहेरी मार्ग पूर्ण झाल्यानंतर गाड्यांची वेळेवर धावण्याची क्षमता वाढणार असून मार्गावरील वाहतूक क्षमता देखील मोठ्या प्रमाणात वाढेल.
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता भविष्यात मुंबई-गोवा मार्गावर अतिरिक्त वंदे भारत सेवा सुरू करण्याचा किंवा अधिक क्षमतेच्या गाड्या चालवण्याचा विचारही रेल्वे प्रशासन करत आहे.
16 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस आणि कोकण रेल्वेवरील पायाभूत सुविधांमधील सुधारणा यामुळे मुंबई-गोवा प्रवास अधिक जलद, आरामदायी आणि सोयीस्कर होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे मत आहे.
हेही वाचा
