Advertisement

बॉलीवूडची लोकं इतकी बिनधास्त कशी वागू शकतात? महापौरांचा सेलिब्रिटींना सवाल

मुंबईतील कोरोनाचं संकट अजून गेलं नसतानाही बॉलिवूड कलाकार असं बिनधास्त कसे वागू शकतात? असा सवाल मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

बॉलीवूडची लोकं इतकी बिनधास्त कशी वागू शकतात? महापौरांचा सेलिब्रिटींना सवाल
SHARES

मुंबईतील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये कॅनेडियन रॅपरचा कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टला बॉलिवुडच्या अभिनेत्रींसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकरही उपस्थित होती. या कॉन्सर्टचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसतंय. दरम्यान, मुंबईतील कोरोनाचं संकट अजून गेलं नसतानाही बॉलिवूड कलाकार असं बिनधास्त कसे वागू शकतात? असा सवाल मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये झालेल्या कॅनेडियन रॅपरच्या कॉन्सर्टला सारा अली खान, तिचा भाऊ इब्राहिम अली खान, शिबानी दांडेकर, जान्हवी कपूर, सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी कॉन्सर्टमध्ये प्रचंड गर्दी होती. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी बॉलिवुड कलाकारांना झापलं आहे.

''राज्यातील कोरोना संपलेला नाही, ऑमिक्रॉनचं नव संकट समोर उभं आहे. अशा परिस्थितीत बॉलीवूडमधील सेलिब्रिटी इतक्या बिनधास्त आणि बेबंद वृत्तीनं कसं वागू शकतात'', अशा शब्दांत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली. ग्रँड हयातमधील कॉन्सर्टमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मी ग्रँड हयातच्या प्रशासनाला फोन करुन याविषयीचा जाब विचारला. राजकारणातील आणि बॉलीवूडमधील व्यक्तींनी या गोष्टींचं भान ठेवले पाहिजे.

कोरोना असूनही सुशिक्षित नागरीक बेबंदशाहीने वागतात. कोरोना नाही, असं भासवलं जातं. अनेक सेलिब्रिटींचे मुलं या पार्टीत होती. त्यांनी मजा करावी, पण अशा पद्धतीनं नाही. अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 

या दोघीही अनेक बॉलीवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या. करिनाच्या घरी २ लहान मुलं आहेत. त्यामुळं कोरोना असतानाही इतकं बिनधास्त वागणं योग्य नसल्याचं मत किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले.

प्रशासन कोरोनाचे निर्बंध आणखी किती कडक करणार? उद्या परत काही करुन दिले नाही तर राज्य सरकारच्या नावानं आरडाओरडा केला जातो. यानंतरही लोकांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर अजित पवारांच्या इशाऱ्याप्रमाणे साथरोग नियंत्रण कायद्याच्या वापराचा विचार करावा लागेल, असा इशाराही महापौरांनी दिला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा