Advertisement

रेल्वेच्या दुर्लक्षामुळेच पूल कोसळला- महापौर


रेल्वेच्या दुर्लक्षामुळेच पूल कोसळला- महापौर
SHARES

अंधेरी रेल्वे रूळावर मंगळवारी सकाळी गोखले पादचारी पुलाचा भाग कोसळला असून त्यामुळे पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईकरांचे हाल सुरू असून एनडीआरएफ, पोलिस, रेल्वे आणि अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू आहे. रेल्वेची सेवा पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडं या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरत सर्वच राजकीय पक्षांनी रेल्वेवर टीकास्त्र सुरू केलं आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं पुल कोसळल्याचा आरोप केला आहे.


जबाबदारी रेल्वेची

अंधेरीतील ज्या गोखले पादचारी पुलाचा भाग कोसळला आहे तो पालिकेचा असला तरी त्या पुलाच्या डागडुजीची जबाबदारी पालिकेची नव्हती. डागडुजीसाठी पालिका रेल्वे प्रशासनाला पैसे देत होती. असं असताना रेल्वेनं या पुलाकडं दुर्लक्ष केलं आणि त्याचाच परिणाम मंगळवारी दिसल्याची प्रतिक्रिया महापौरांनी दिली आहे.


एल्फिन्स्टन दुर्घटनेतून काहीही शिकलो नाही

महापौरांनी रेल्वेकडं बोट दाखवलं आहे तर काँग्रेसनंही रेल्वेलाच टार्गेट केलं आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतरही आपण काही शिकलेलो नाही, असं म्हणत काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरूपम यांनी रेल्वेलाच जबाबदार धरलं आहे. मुंबईकरांची लाईफलाईन रेल्वे असून रेल्वे ठप्प तर मुंबई ठप्प. त्यामुळं मुंबईकरांसाठी काय महत्त्वाचं आहे, हे समजून घेत रेल्वे सेवा मजबूत करण्याची खरी गरज आहे. बुलेट ट्रेनची मुंबईकरांना मुळीच गरज नाही, त्यामुळे बुलेट ट्रेन सोडा, रेल्वेवर लक्ष द्या असा टोलाही निरूपम यांनी लगावला आहे.


दोषींवर कडक कारवाई करा

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेनं सर्व पुलाचं आडिट झालं असून सर्व पुल सुरक्षित असल्याचा दावा केला होता. हा दावा यानिमित्तानं खोटा ठरल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. तर दोषींवर कडक कारवाई करण्याचीही मागणी उचलून धरली आहे. दरम्यान मनसेचे संदीप देशपांडे यांनीही यासाठी रेल्वेलाच जबाबदार धरलं आहे. तर बुलेट ट्रेन नाही तर मुंबईकरांसाठी सुरक्षित रेल्वे प्रवास गरजेचा असल्याचही स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा -

अंधेरीत पादचारी पुलाचा भाग कोसळला, अंधेरी विरार रेल्वे सेवा ठप्प

पश्चिम रेल्वे म्हणतेय, विरार-चर्चगेटदरम्यानचे सर्व पूल सुरक्षित



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा