Advertisement

महापौरांना निवासस्थान हवंय मलबार हिललाच


महापौरांना निवासस्थान हवंय मलबार हिललाच
SHARES

शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर महापौरांचे बस्तान राणीबागेतील बंगल्यात हलवण्याचा विचार प्रशासनावतीने चालू आहे. मात्र, राणीबागेतील महापौर निवासाला खुद्द विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी विरोध दर्शवला आहे. राणीबागेतील बंगल्याऐवजी मलबार हिल येथील अतिरिक्त आयुक्त यांच्या निवासस्थानांच्या जागेतच महापौरांच्या निवासस्थानाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी शिवाजी पार्कमधील महापौर निवासाची जागा देण्यात आल्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील पूर्वीच्या अतिरिक्त आयुक्तांच्या निवास्थानाच्या जागेत महापौरांचे निवास बनवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या पर्यायी निवासस्थान देण्याचा निर्णयालाच महापौरांनी विरोध दर्शवून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वन्यप्राण्यांमुळे राणीबाग हे शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. जागेअभावी तसेच शांतताक्षेत्र असल्यामुळे टीका होण्याची दाट शक्यता आहे. शांतता क्षेत्रामुळे या परिसरात संध्याकाळी सहानंतर आवाजास प्रतिबंध असल्यामुळे आणि कार्यक्रमाच्यावेळी ध्वनीक्षेपक लावणे अपरिहार्य असल्यामुळे, वन्यजीवांच्या शांततेला बाधा निर्माण होईल. परिणामी महापौर निवासस्थानी होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनावर मर्यादा येतील. 

महापौरांच्या दैनंदिन भेटीकरता येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह अनेक मान्यवर, महत्त्वाच्या व्यक्ती, परदेशी पाहुणे, येत असतात. भेटायला येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता ही जागा अपुरीच आहे. त्यामुळे निवासस्थानाची ही जागा अत्यंत गैरसोयीची असल्यामुळे तसेच याठिकाणी वाहने उभी करण्यासाठी असलेली जागाही कमी असल्यामुळे एकप्रकारे गैरसोयीचाच सामना करावा लागणार आहे. त्यामुळे याचा सर्वंकष विचार करता महापौरपदाची शान अबाधित राहिल यादृष्टीने भायखळा येथील निवासस्थानाऐवजी मलबाल हिल येथील अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), अतिरिक्त आयुक्त (शहर) यांची निवासस्थाने येथे महापौरांकरता निवासाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी स्वरुपात केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा