Advertisement

मुंबई महापालिकेच्या विभाजनाला महापौरांचं समर्थन


मुंबई महापालिकेच्या विभाजनाला महापौरांचं समर्थन
SHARES

मुंबई महापालिका सर्वच विभागांना न्याय देऊ शकत नसल्यानं पालिकेचं तीन विभागांमध्ये विभाजन करण्याच्या काँग्रेस आमदार नसीम खान यांच्या मागणीवरून शिवसेना आणि भाजपा आक्रमक झालेले असतानाच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मात्र काँग्रेसच्या मागणीचं समर्थन केलं आहे. आमदाराला अशाप्रकारचा मुद्दा विधीमंडळात उपस्थित करण्याचा अधिकार असून त्यावर चर्चा होणं स्वाभावीक असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं. त्यामुळे नसीम खान यांच्या त्रिभाजनाच्या मागणीला पाठिंबा देत महापौरांनी एकप्रकारे भाजपाच्या आशिष शेलारांच्या आरोपांची हवा काढतानाच आपल्याच पक्षाचे अामदार सुनील प्रभू यांनाही घरचा आहेर दिला आहे.


काँग्रेस आमदार नसीम खान यांनी विधानसभेत मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करण्याची मागणी केल्यानंतर भाजपाचे अॅड. आशिष शेलार यांनी ही मागणी मागे घ्यावी, अशी मागणी केली. मुंबई महापालिकेचं विभाजन करून मुंबईचे तुकडे करण्याचा त्यांचा डाव अाहे का, अशी शंका निर्माण होते, असं शेलार यांनी सांगितलं होतं.


शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी नसीम खान यांच्या मागणीचा आपण निषेध करत असून जोपर्यंत ते आपले वक्तव्य मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना सभागृहात बोलू देणार नाही, असा इशारा दिला होता.


सभागृहात या मुद्दयावरून गदारोळ झाला असताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मात्र या मुद्दयावर चर्चा होणं अपेक्षित असल्याचं म्हटलं अाहे. मुंबईत जी अनधिकृत बांधकामं उभी राहत अाहेत, त्यावर कारवाई व्हायलाच हवी. त्यामुळे अशा अनधिकृत बांधकामांप्रकरणी जे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त तसंच खात्याचे अधिकारी जबाबदार असतील, त्या सर्वांवर कारवाई व्हायला हवी. तसेच नियम डावलून कारखाने चालवले जात आहेत, त्यांच्यावरही तात्काळ कारवाई करायला हवी, असंही महापौरांनी स्पष्ट केलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा