आता गुन्हा घडून गेल्यावर नाही, तर वेळेआधीच पोहोचतील पोलीस!

  Mumbai
  आता गुन्हा घडून गेल्यावर नाही, तर वेळेआधीच पोहोचतील पोलीस!
  मुंबई  -  

  अडचणीच्या वेळेस मदत मागायची असल्यास सर्वात पहिल्यांदा फोन लावला जातो तो १०० क्रमांकाला. हा क्रमांक पोलीस नियंत्रण कक्षाचा असल्याने या ठिकाणहून अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला पोलिसांच्या बीट मार्शल, मोबाईल व्हॅनद्वारे त्वरीत मदत पोहोचवली जाते.

  परंतु अनेकदा नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्याचा अचूक पत्ता न सापडल्याने पोलिसांना त्याला वेळेत मदत करता येत नाही. त्यामुळेच बहुधा एखादा गुन्हा घडून गेल्यावर किंवा गुन्हेगार पळून गेल्यावरच पोलीस घटनास्थळी हजर होतात, अशी सर्वच हिंदी सिनेमात पोलिसांची नकारात्मक प्रतिमा रंगवण्यात आली आहे.

  असो. उशीरा का होईना, पण ही अडचण सोडविण्यासाठी मुंबई पोलिसांनी मुख्य नियंत्रण कक्षात एक नवीन सॉफ्टवेअर बसवले असून या सॉफ्टवेअरच्या मदतीने फोन करणाऱ्या व्यक्तीचे अचूक स्थळही पोलिसांना कळणार आहे.

  या सॉफ्टवेअरच्या आधारे पोलिसांना कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचून गुन्हा रोखण्यास, महिलांना सुरक्षा पोहचविण्यास किंवा संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करता येणार आहे.

  कागदोपत्री पोलिसांचा प्रतिसादाचा वेळ (रिस्पॉन्स टाईम) १० निनिटांचा असला तरी कित्येकदा घटनास्थळी पोहोचायला याहूनही जास्त वेळ लागतो. मात्र या नवीन प्रणालीमुळे 'रिस्पॉन्स टाईम'मध्ये कमालीची सुधारणा होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


  असे काम करेल सॉफ्टवेअर

  मुंबईच्या पोलीस मुख्यालयात हे सॉफ्टवेअर लावण्यात आले आहे. नियंत्रण कक्षातील सर्व टेलिकॉम ऑपरेटर प्रोव्हायडर या सॉफ्टवेअरशी जोडण्यात आले आहेत. याद्वारे कॉल करणाऱ्या व्यक्तीचे अचूक ठिकाणही पोलिसांना कळेल. १०० क्रमांकावर फोन आल्यावर मुख्य नियंत्रण कक्षातून स्थानिक पोलिसांना फोन करणाऱ्याची माहिती आणि त्याचे ठिकाणही सांगण्यात येईल.


  कुठलेही शुल्क नाही

  पोलिसांच्या या नव्या सेवेचा भार १०० क्रमांकावर फोन करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीवर पडणार नाही. ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क असेल.


  दररोज येतात ५० हजार कॉल

  मुंबई पोलिसांच्या १०० क्रमांकावर दररोज ५० हजारांहून अधिक कॉल येतात. यामध्ये काही कॉल ब्लँक कॉल, तर काही मिस कॉलही असतात. बॉम्ब किंवा अन्य गुन्ह्याची अफवा पसरवणारेही काही फोन असतात. नव्या सॉफ्टवेअरच्या मदतीने पोलिसांना खोटे कॉल करून उगास त्रास देणाऱ्यांवरही अंकुश लावता येणार आहे.


  पोलिसांना खास प्रशिक्षण

  या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सोबतच कमीत कमी वेळेत मदत पोहोचविण्यासाठी बीट मार्शल आणि पोलीस कंट्रोल रुम (पीसीआर) व्हॅनची संख्याही वाढविण्यात येईल.


  ओळख सार्वजनिक होणार नाही

  या क्रमांकावर फोन करणाऱ्या व्यक्तीची माहिती जरी पोलिसांना त्वरीत होणार असली, तरी तक्रारदाराची ही ओळख पोलीस गुप्त ठेवतील.  हे देखील वाचा -

  पोलिसच झाले दरोडेखोर, चोरले २४ लाखांचे हिरे  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.