Advertisement

दिलासादायक! 'नाइट कर्फ्यू'बाबत मुंबई पोलिसांचे निवेदन

मुंबईतील महापालिका क्षेत्रांत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. परंतू, या संचारबंदीमुळं मुंबईकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दिलासादायक! 'नाइट कर्फ्यू'बाबत मुंबई पोलिसांचे निवेदन
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी महापालिका मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक उपाययोजना करत आहे. अशातच ब्रिटनमध्ये नवा कोरोना जन्माला आल्यानं संपुर्ण जगभरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. नवा कोरोना किती धोकादायक असेल याची भीती नागरिकांना सतावत आहे. त्यामुळं मुंबईकरांचं या नव्या कोरोनाच्या संसर्गापासून रक्षण व्हावं यासाठी महापालिकेनं कंबर कसली आहे. दररोज करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीत वाढ केली असून, मुंबईतील महापालिका क्षेत्रांत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. परंतू, या संचारबंदीमुळं मुंबईकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

महापालिका क्षेत्रांत लागून करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीमुळं घराबाहेर पडायचं का? नक्की काय खबरदारी घ्यायची? असे अनेक सवाल मुंबईकरांना पडत आहेत. मात्र, या प्रश्नांना आता मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी उत्तर देत पुर्णविराम दिला आहे.

कोरोनाचा संसर्ग आणि नाताळ व नवीन वर्षाचं सेलिब्रेशन या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात महापालिका क्षेत्रांत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. ही संचारबंदी असली तरी घराबाहेर पडण्यास मुभा आहे. मात्र, गर्दी जमवू नका असं आवाहन मुंबई पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे. ४ पेक्षा अधिक जण एकत्र जमल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे.

कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यातच हा विषाणू नवनवीन रूपं धारण करीत आहे. त्यामुळं खबरदारी बाळगावी लागणार आहे. २५ तारखेला येणारा नाताळचा सण आणि नववर्षाच्या स्वागताला पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लोक एकत्र येतात. यातून संसर्ग वाढण्याचा धोका असल्यानं राज्यात पालिका क्षेत्रांत ५ जानेवारी पर्यंत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. मात्र, यामुळं नोकरदार, सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये संभ्रम असल्यानं मुंबई पोलिसांनी ही नियमावली नेमकी काय आहे, याबाबत स्पष्टता केली आहे.

राज्य सरकारनं लावलेली संचारबंदी ही आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी असल्याचं विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या आवाहनात म्हटलं आहे. रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. रात्रपाळीची कार्यालयं वगळता पब, हॉटेल्स, सिनेमागृह अशी करमणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या आस्थापना रात्री ११ वाजता बंद करणं बंधनकारक असल्याचं ही नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

संचारबंदीमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. संचारबंदीच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिक एकटेदुकटे घराबाहेर पडू शकतात. दुचाकी किंवा कारनं प्रवासही करता येऊ शकतो. मात्र, यामध्येही ४ पेक्षा अधिक व्यक्ती नको, असंही विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकार, पोलिस तसंच इतर यंत्रणांच्या वतीनं घेतले जाणारे निर्णय, निर्बंध सर्वांसाठी फायद्याचे असल्यानं शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं, असं ही आवाहन त्यांनी मुंबईकरांना केलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा