नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने पुण्याच्या कार्ला येथील एकविरा देवी मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरळीत, सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
मोटार वाहन कायदा, 1988चे कलम 115 तसेच शासन गृह विभागाचे 19/05/1990 चे अधिसूचनेन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.
दि. 22 सप्टेंबर 2025 ते दि. 02 ऑक्टोबर 2025 या कालावधीत कार्ला फाटा ते श्री. एकविरा देवी पायथा मंदिर या मार्गावर अवजड आणि मोठ्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश निषिद्ध (No Entry) राहील.
दि. 27 सप्टेंबर 2025 ते दि. 01 ऑक्टोबर 2025 सकाळी 06.00 ते रात्री 22.00 या वेळेत जुना मुंबई–पुणे व पुणे–मुंबई महामार्गावरील कुसगाव बुद्रुक टोलनाका लोणावळा ते वडगाव फाटा वडगाव मावळ या दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश निषिद्ध (No Entry) राहील.
जुना मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याकडे जाणारी जड आणि अवजड वाहने ही लोणावळा येथील कुसगाव बुद्रुक टोलनाका मार्गे एक्सप्रेस हायवेने उर्से टोलनाक्यामार्गे पुणे शहराकडे वळविण्यात येतील. पुणे-मुंबईकडे जाणारी जड आणि अवजड वाहने ही वडगाव येथील तळेगाव फाटा मार्गे उर्से खिंडीतून एक्सप्रेस हायवेने मुंबईकडे वळविण्यात येतील.
हेही वाचा