Advertisement

'या' भागांत पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज

दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे.

'या' भागांत पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज
SHARES

मुंबईसह राज्यभरात थंडी पडली असून, अनेक ठिकाणी गारेगार वातावरण आहे. असं असलं तरी आजही अनेक भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. शिवाय, मुंबई, ठाणे व पुण्यातही पाऊस पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे.

मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस होणार आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरींची नोंद झाली. डिसेंबरप्रमाणेच जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीच्या वाटेत कमी दाबाच्या क्षेत्रांचे आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे अडथळे आले. त्यामुळेच उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असतानाही राज्यातील रात्रीचे तापमान सरासरीखाली येऊ शकले नाही.

सध्या पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातही पावसाळी स्थिती आहे. तसंच, दक्षिण मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आहे. या भागातून कोकण ते उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रातून बाष्प येत असल्याने थंडी पूर्णपणे गायब होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात ९ जानेवारीपर्यंत पावसाळी स्थिती राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात ८ जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७ ते ९ जानेवारी या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, ८ जानेवारीला नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. ८ आणि ९ जानेवारीला मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा