सोमवारी मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ३४ ते ३६ अंशांदरम्यान तापमान नोंदवले गेले. विदर्भातही हळूहळू ही वाढ जाणवू लागली आहे. राज्यामध्ये आता उन्हाळा स्थिरावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मुंबईच्या सांताक्रूझ येथील कमाल तापमानात सरासरीपेक्षा ४.६ अंशांची वाढ नोंदली गेली. किमान तापमानही रविवारपेक्षा अधिक नोंदवले गेले. सांताक्रूझ येथे किमान तापमान २०.६ अंश होते, तर कुलाबा येथे २१.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. कुलाब्याचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस होते. हे तापमानही सरासरीपेक्षा ४.६ अंशांनी अधिक होते.
मार्चमध्ये मुंबईकरांनी ४१ अंशांपेक्षा जास्त कमाल तापमानही अनुभवले आहे. गेल्या वर्षी मार्च अखेरीस हा पारा ४०.३ अंशांपर्यंत पोहोचला होता, तर सन २०१८ मध्ये हे तापमान ४१ अंश होते. हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार १८ मार्चपर्यंत कमाल तापमान ३६ किंवा त्यापेक्षा अधिक असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर पारा थोडा खाली उतरण्याची शक्यता आहे. राज्यभरात सोमवारी सर्वाधिक कमाल तापमान मुंबईमध्ये नोंदवले गेले.
पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी राज्यभरातच कमाल तापमान वाढले आहे. रविवार आणि सोमवारच्या कमाल तापमानात अनेक ठिकाणी फरक दिसत आहे. पुणे ३५.७, लोहगाव ३६.१, कोल्हापूर ३६.८, सोलापूर ३६.९, परभणी ३६.२, बीड ३६.८ अशी सोमवारी तापमान नोंद झाली. विदर्भातील तापमान सध्या सरासरीपेक्षा कमी आहे. मात्र अकोला येथे ३६.३, अमरावती येथे ३५, वर्धा येथे ३५.२ असा पारा नोंदला गेला.
रविवारी कमाल तापमान ३४ अंशांपर्यंत होते. सोमवारी विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या आत होते. त्यामुळे सकाळ अजूनही सुखावह आहे. मात्र कमाल आणि किमान तापमानात १५ अंशांपर्यंतचा फरक जाणवत आहे. राज्यभरात आता तापमान वाढत असल्याने उन्हाळ्याच्या दृष्टीने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.