मुंबईतील रस्त्यांवरील दहा टक्के पथदिवे एलईडीचेच

  Mumbai
  मुंबईतील रस्त्यांवरील दहा टक्के पथदिवे एलईडीचेच
  मुंबई  -  

  मुंबई - मरिन ड्राईव्हवरील सोडियम व्हेपर पिवळे दिवे काढून त्याठिकाणी एलइडीचे दिवे बसवण्याचा प्रयत्न महापालिकेने केला होता. पण न्यायालयाने दट्टा दिल्यामुळे पुन्हा त्याठिकाणी सोडियम व्हेपरचे दिवे बसवण्यात आले. मात्र, एलईडीच्या दिव्यांना शिवसेनेने विरोध केला असला तरी प्रत्यक्षात मुंबईतील सर्वच पथदिव्यांपैंकी दहा टक्के दिवे हे एलईडीचे बसवण्यात येणार असून, बेस्टसह रिलायन्स एनर्जी आणि महावितरण या कंपन्यांच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जात आहे.

  भारत सरकारने ऊर्जा बचतीसाठी सार्वजनिक ठिकाणी असलेले तसेच रस्त्यांवरील दिवाबत्तीच्या दिव्यामध्ये असलेले सोडियम व्हेपरचे दिवे बदलून त्या जागी ऊर्जा बचत करणारे एलईडीचे दिवे बसवण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. त्यानुसार मरिन ड्राईव्हच्या पदपथावरील दिवे एलईडी बदलण्यात आले होते. त्यानुसारच महापलिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एलईडी दिवे बसवण्यासाठी एक समिती स्थापन केली. यामध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक, महावितरण व रिलायन्स, यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता व वाहतूक विभागाचे उपप्रमुख अभियंता आदी सदस्य आहेत.

  समितीच्या शिफारशीनुसार एलईडीचे दिवे, पुरवठा, उभारणी व देखरेखीसाठी बेस्टचे महाव्यवस्थापक यांनी एकूण पथदिव्यांपैकी दहा टक्के दिवे एलईडी दिव्यांमध्ये रुपांतरीत करण्यासाठी निविदा मागवली आहे. सर्व विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यकक्षेत येणाऱ्या विभागामधील एकूण दिवाबत्तीपैकी दहा टक्के सोडियम व्हेपर असलेले दिवे एलईडीमध्ये बदलण्यासाठी यादी प्रायोगिक तत्वावर काम करण्यासाठी कंत्राटदार कंपनीला पुरवली आहे. उर्वरीत सोडियम व्हेपरचे दिवे टप्याटप्याने निविदा काढून बदलले जाणार आहे. त्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे महापलिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले आहे.

  बेस्टप्रमाणेच रिलायन्स आणि महावितरण हे त्यांच्या कार्यकक्षेतील अर्थात उपनगरांमधील पथदिव्यांकरता निविदा मागवण्यात येणार आहे. एलईडी दिव्यांच्या पथदिव्यांकरता सर्व भाडेतत्वावर येणारा खर्च हा बेस्ट उपक्रमाच्यावतीने ठरवण्यात येणार आहे. त्याबाबत रिलायन्स व महावितरण यांना याची माहिती कळवण्यात येत आहे. संपूर्ण मुंबईत रस्त्यावरील तसेच पदपथावरील तसेच उड्डाणपूलावरील एलईडी दिवे बसवण्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.