Advertisement

मुंबईतील मैलाच्या दगडांची उभारणार प्रतिकृती!


मुंबईतील मैलाच्या दगडांची उभारणार प्रतिकृती!
SHARES

ब्रिटीशांनी मुंबईत उभारलेले मैलाचे दगड आता जमिनीखाली गडप झाले आहे. पण आता या सर्व दगडांचा शोध घेऊन ऐतिहासिक वारसा म्हणून त्यांचं जतन होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईत असलेल्या १५ मैलांच्या दगडांपैकी १० दगडांचा शोध लागला असून या सर्वांचं जतन अणि संवर्धन केलं जणार आहे. शिवाय जे ५ दगड अस्तित्वात नाहीत, त्या ठिकाणी मैलाच्या दगडाची बेसॉल्ट दगडामध्ये अथवा अन्य टिकाऊ वस्तुंमध्ये प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे.



दगडांचं होणार जतन, संवर्धन, सुशोभिकरण

मुंबई शहरात १५ ठिकाणी मैलाचे दगड अस्तित्वात होते. या मैलाच्या दगडांना 'मुंबई वारसा जतन समिती'ने ग्रेड वनचा दर्जा दिला आहे. या मैलाच्या दगडांचा ऐतिहासिक दर्जा टिकून राहण्यासाठी त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या मैलाच्या दगडांचं जतन, संवर्धन आणि सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


'या' दोन्ही दगडांचा जिर्णोद्धार

हेरिटेज लिस्टमध्ये १५  मैलाच्या दगडांपैकी ५ ठिकाणचे मैलाचे दगड काळाच्या ओघात नष्ट झाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. उर्वरीत १० मैलांचे दगड, रस्ते आणि पदपथांची उंची वाढल्यामुळे जमिनीत गाडले गेले होते. या दहा दगडांपैकी डॉ. एस. एस. राव मार्गावरील मैलाच्या दगडाचा जिर्णोद्धार एफ-दक्षिण विभागाने केला आहे. त्यानंतर ऑगस्ट क्रांती मार्ग, सेट्रल बँक समोरही ३ मैलाचे दगड आढळून आले. त्या दगडांचा डी विभाग कार्यालयातर्फे जिर्णोद्धार करण्यात आला. या दोन्ही दगडांचा जिर्णोद्धार सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे.


पुरातन वास्तू सल्लागाराची घेणार मदत

हा दगड जमिनीत खोदून, त्यावरील तेलाचे आणि रासायनिक द्रव्याचे डाग स्वच्छ करून त्याभोवतीचा परिसर कोबाल्ट स्टोन बसवून सुशोभित करण्यात आला. तसेच जे ५ दगड अस्तित्वात नाहीत, त्याठिकाणी मैलाच्या दगडाची बेसॉल्ट दगडामध्ये अथवा अन्य टिकाऊ वस्तूंमध्ये प्रतिकृती निर्माण करण्यात येईल. या कामासाठी पुरातन वास्तू सल्लागाराची मदत घेण्यात येईल, असंही इमारत परीक्षण विभाग तसेच हेरिटेज विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सावंत यांनी सांगितलं.


ब्रिटिशांनी का बसवले होते दगड?

ब्रिटीश राजवटीत मुंबई शहरात सेंट थॉमस कॅथड्रल चर्च, हॉर्निमल सर्कल, फोर्ट येथे शून्य मैल प्रमाणित करून तेथून प्रत्येक मैलावर अंतर निर्देशांक मैलाचे दगड रोवण्यात आले होते. हे दगड १८३७च्या पूर्वी मुंबई शहरातील मुख्य रस्त्यांवर दक्षिणेपासून उत्तरेकडे बसवण्यात आले होते. त्याकाळी सर्व मुख्य रस्ते हे सेंट थॉमस चर्चपासून सुरू होत होते. तसेही त्याकाळी मुंबई शहरात फारच थोडे रस्ते होते आणि लोक त्यावर रस्त्यांवरून घोड्याने प्रवास करत असत. जनतेला आणि प्रवाशांना सेंट थॉमस चर्चपासून अंतर समजण्यासाठी हे मैलाचे दगड बसवण्यात आले होते. त्याकाळी मुंबईमध्ये टाऊन हॉल अथवा पोस्ट ऑफिस अशी महत्त्वाची वास्तू शहराच्या दक्षिण टोकाला अस्तित्वात नव्हती. त्यामुळेच ब्रिटिशांनी सेंट थॉमस चर्च या मुंबईतील सर्वप्रथम चर्चची शून्य मैलासाठी निवड केली.


मुंबईत कुठे कुठे आहेत मैलाचे दगड

शून्य मैल : सेंट थॉमस कॅथड्रल चर्च, हॉर्निमल सर्कल
1 मैल : काळबादेवी रोड, नवलखी समोर
2 मैल : इब्राहिम रहिमतुल्ला रोड, युनियन बँक, नळबाजार
3 मैल : डॉ. मस्करेन्हास रोड, माझगाव
3 मैल : ऑगस्ट क्रांती मार्ग, गवालिया टँक शाखा
3 मैल : जावजी दादाजी मार्ग, भाटीया रुग्णालयासमोर
4 मैल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिंचपोकळी मार्ग
4 मैल : ना.म.जोशी मार्ग,चिंचपोकळी पूल
5 मैल : डॉ. एस.एस.राव मार्ग, साई टेडर्स समोर
5 मैल :ना.म.जोशी मार्ग, ईएसआयएस भवन समोर
6 मैल :डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चित्रा सिनेमा समोर
7 मैल : एस. के.भोले मार्ग, अन्थोनी डिसिल्वा शाळेसमोर
7 मैल : शीव पूर्व कर्नाटक बँकसमोर, स्किम नंबर ६, रोड क्रमांक ३०
7 मैल : लेडी जमशेटजी मार्ग, कटारिया मार्ग जंक्शन (उत्तर)
बेंच मार्क मुंबई : वीर नरिमन रोड, पीडब्लूडी इमारतीच्या बाहेरील प्रवेशद्वार
मुंबई टाऊन लिमिट : वीर नरिमन रोड, मार्कर स्टोन



हेही वाचा

अस्तंगत झालेला मैलाचा दगड

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा