
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते वरुण सरदेसाई यांनी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील 5 एकर सार्वजनिक उद्यान सर्वसामान्यांसाठी बंद करून ते मुख्यतः एमएमआरडीए अधिकाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वापरले जात असल्याचा आरोप केला आहे.
ट्विटरवरील पोस्टमध्ये सरदेसाई यांनी दावा केला की, वांद्रे पूर्व आणि आसपासच्या परिसरासाठी “ग्रीन लंग” म्हणून करदात्यांच्या पैशातून विकसित करण्यात आलेला आहे. पण हे उद्यान आता सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध नाही. उद्यानात प्रवेश केवळ एमएमआरडीएच्या “जेटवन” कर्मचारी निवासस्थानातूनच दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
या ठिकाणी सुशोभित बागांसह टेनिस कोर्ट आणि क्रिकेट टर्फसारख्या क्रीडा सुविधा असून त्यांचा वापर फक्त अधिकाऱ्यांकडून केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अलीकडेच एमएमआरडीए कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजनही या परिसरात करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेले उद्यान काही निवडक नोकरशहा आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खासगी मनोरंजन स्थळात रूपांतरित करण्यात आल्याचा आरोप करत सरदेसाई यांनी याला सार्वजनिक संसाधनांचा गैरवापर म्हटले आहे. सार्वजनिक प्रवेश कोणत्या अधिकाराखाली बंद करण्यात आला, असा सवाल उपस्थित करत त्यांनी एमएमआरडीएकडे उत्तरदायित्वाची मागणी केली.
या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत सरदेसाई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे. मर्यादित गटासाठी वापरल्या जाणाऱ्या या सुविधेच्या देखभालीसाठी करदात्यांचा पैसा वापरला जात असल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
तपास पूर्ण होईपर्यंत सार्वजनिक प्रवेश रोखणारे आणि निधीचा कथित गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
“सार्वजनिक जमीन ही नागरिकांची आहे. ती सरकारी अधिकाऱ्यांसाठी खासगी जागा बनवता येणार नाही,” असे म्हणत सरदेसाई यांनी आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली.
हेही वाचा
