Advertisement

समुद्र प्रदूषित केल्याप्रकरणी हाजी अली ट्रस्टला हरित न्यायाधिकरणाचा दणका, बजावली नोटीस

हाजी अली दर्ग्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे समुद्र प्रदूषित होत असल्याचं म्हणत हरित न्यायाधिकरणानं हाजी अली ट्रस्टला नोटीस बजावली आहे. एवढंच नव्हे, तर परिसर प्रदूषणरहित आणि स्वच्छ, सुंदर कसा राहील याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याचेही आदेश दिल्याची माहिती याचिकाकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

समुद्र प्रदूषित केल्याप्रकरणी हाजी अली ट्रस्टला हरित न्यायाधिकरणाचा दणका, बजावली नोटीस
SHARES

धार्मिक स्थळं, मग ती कितीही महत्त्वाच्या ठिकाणी असोत तिथला परिसर स्वच्छ आणि सुंदर असायलाच हवा, असं म्हणत पुण्याच्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने हाजी अली ट्रस्टला दणका दिला आहे. हाजी अली दर्ग्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे समुद्र प्रदूषित होत असल्याचं म्हणत हरित न्यायाधिकरणानं हाजी अली ट्रस्टला नोटीस बजावली आहे. एवढंच नव्हे, तर परिसर प्रदूषणरहित आणि स्वच्छ, सुंदर कसा राहील याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याचेही आदेश दिल्याची माहिती याचिकाकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


आरोग्याकडे दुर्लक्ष

हाजी अली दर्गा हे मुस्लिम बांधवांचं महत्त्वाचं श्रद्धास्थान. समुद्रामध्ये असणारं हे एकमेव आणि देखणं असं धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांसह हजारो पर्यटक देखील रोज हाजी अली दर्ग्याला भेट देतात. मात्र हाजी अली दर्ग्याला भेट देणाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक स्वच्छतेकडे दर्गा ट्रस्टकडून मोठं दुर्लक्ष केलं जात असल्याचं निदर्शनास आलं आहे.


२० हजार लिटर मलमूत्र समुद्रात

आठवड्याला दर्ग्यातून २० हजार लिटर मलमूत्र समुद्रात सोडलं जात असल्यामुळे समुद्राचं पाणी प्रदूषित होत चाललं आहे. दर्ग्यात चढवण्यात येणाऱ्या चारदींसह पाण्याच्या बाटल्याही समुद्रात फेकण्यात येतात. त्यामुळे प्रदूषणात आणखी भर पडत असल्याचंही समोर आलं आहे.


हरित न्यायाधिकरणात याचिका

हीच बाब लक्षात घेत अॅड. सरोदे यांनी या अस्वच्छतेसह समुद्राच्या प्रदूषणाकडं लक्ष वेधण्यासाठी हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायाधिकरणाने मुंबई महापालिका तसेच राज्य सरकारची चांगलीच कान उघडणी करत यासंबंधीचं प्रतिज्ञापत्र ५ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच हाजी अली ट्रस्टला नोटीस बजावली आहे.

यासंबंधीची पुढील सुनावणी ५ मार्चला होणार असल्याने आता सर्वांचेच लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. या नोटीशीनंतर हाजी अली ट्रस्ट प्रदूषण रोखत स्वच्छतेच्यादृष्टीने कधी आणि काय पावलं उचलते हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा-

हाजी अली दर्ग्यात महिलांचा प्रवेश


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा