Advertisement

दक्षिण मुंबईतील मलबार हिल टेकडीजवळ निसर्ग उन्नत मार्ग

महापालिकेच्या जल अभियंता विभागानं हा उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण मुंबईतील मलबार हिल टेकडीजवळ निसर्ग उन्नत मार्ग
SHARES

दक्षिण मुंबईतील मलबार हिल टेकडी येथील कमला नेहरू उद्यान व फिरोजशहा उद्यानाजवळ निसर्ग उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या जल अभियंता विभागानं हा उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. टेकडीच्या उतारावरील जंगलाचे, तसेच तेथे संचार करणारे पशू, पक्षी व वन्य जीवांचे दर्शन आणि त्यांचे आवाज ऐकत टेकडीवर जाता यावे यासाठी हा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे.

कोणत्याही प्रकारे वृक्षहानी व वन्यजीवन हानी होऊ न देता या भूभागातून फेरफटका मागण्याकरिता पर्यटकांना या उन्नत मार्गाने जाता येईल, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या मार्गाकरिता प्रशासनाने वास्तुविशारद व संरचनात्मक सल्लागारांची नियुक्ती केली आहे. त्यांनी सादर केलेली संकल्पचित्रे व आराखड्यानुसार या कामासाठी १२ कोटी ६६ लाख रुपये अंदाजित खर्च अपेक्षित आहे.

मुंबई महापालिकेचा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनाने आता २२ कोटी रुपये खर्च करून मलबार हिल टेकडीजवळ जाण्यासाठी निसर्ग उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या टेकडीवर जाण्यासाठी उन्नत मार्ग तयार करणे खूप खर्चीक ठरणार असून त्याकरिता कंत्राटदाराने अंदाजित रकमेपेक्षा ३९.९६ टक्के अधिक दराची आकारणी केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च १२ कोटींवरून २२ कोटींवर गेला आहे.

या कामकरिता एकच निविदाकार पुढे आला असून त्यांनी अंदाजित खर्चाच्या तुलनेत सुमारे ५० टक्के अधिक दर निविदेत भरले आहेत. वाटाघाटीअंती कंत्राटदारानं ३९.९६ टक्के अधिक दरात काम करण्याची तयारी दर्शविली आहे.

या उन्नत मार्गाचा खर्च १२ कोटी रुपयांवरून सर्व करांसह २२ कोटी रुपयांवर गेला आहे. या कामासाठी महापालिकेला एकूण २२ कोटी ४९ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

कंत्राटदारानं अंदाजित खर्चाच्या तुलनेत अधिक दर भरला असून खर्च का वाढला याचेही स्पष्टीकरण दिले आहे. कमला नेहरू उद्यानालगतच्या उतारावर हा मार्ग तयार करायचा आहे. सर्व बांधकाम साहित्य, आवश्यक साधनसामग्रीची ने-आण करणे याकरिता जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर करावा लागणार आहे.

कामाचे स्थळ शांतता क्षेत्रात असून त्याचे काम दिवसांतील मर्यादित वेळेतच करावे लागणार आहे. या कामासाठी ३०० चौ. मीटर इतक्या मोठय़ा प्रमाणात साग लाकडाची आवश्यकता असून बाजारात उपलब्ध नसल्यास ते परदेशातून मागवावे लागणार आहे. तसेच ते कारखान्यात कापून आणावे लागणार आहे.

या सर्व प्रक्रियेस जास्त पैसे देऊन कुशल कामगाराची गरज आहे. हे काम करताना माती ढासळून जीवित वा वित्तहानी होणार नाही याकरिता उपाययोजना कराव्या लागणार आहेत. अशी असंख्य कारणे कंत्राटदाराने दिली आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा