स्मारकावर वारेमाप खर्च; तैलचित्रांचं काय?

  Mumbai
  स्मारकावर वारेमाप खर्च; तैलचित्रांचं काय?
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई शहरासाठी योगदान देणाऱ्या थोर महापुरुषांची तैलचित्रे पालिका सभागृहात लावण्यात आली होती. मात्र 17 वर्षांपूर्वी पालिका मुख्यालयाला लागलेल्या आगीत यातली बरीचशी तैलचित्रे जळाली. पण प्रशासनाने अद्यापही ही तैलचित्रे पुन्हा लावलेली नाहीत.
  युसूफ मेहर अली, खुर्शीद फ्रामजी नरिमन, स. का. पाटील, फिरोजशहा मेहता, इब्राहिम रहिमतुल्ला, विठ्ठलभाई पटेल, जे. बी. बोम्मन बेहेराम, व्ही. एन. चंदावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून पालिका सभागृहात त्यांची तैलचित्रे लावण्यात आली. 13 जानेवारी 2000 रोजी पालिका सभागृहाला भीषण आग लागली. या आगीत ही तैलचित्रे जळाली. या घटनेला तब्बल 17 वर्षे लोटल्यानंतरही ही तैलचित्रे पुन्हा लावण्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष दिसून येत आहे.
  भाजपा नगरसेवक आणि सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे हे गेल्या 15 वर्षांपासून ही तैलचित्र पुन्हा लावण्याची प्रशासनाकडे मागणी करत आहेत.
  नुकतेच महापालिकेने प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याचा ठराव मंजूर केला आहे. सोमवार 2 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण केले जाणार आहे.
  पालिका सभागृहात सध्या नानाशंकर शेठ यांचे तैलचित्र आहे. नानाशंकर शेठ यांच्या तैलचित्राच्या बाजूलाच प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. मात्र अजूनही इतर 8 तैलचित्र लावण्याच्या जागा मात्र रिकाम्याच आहेत.

  सावित्रीबाई फुले, कुसुमाग्रज प्रतीक्षेतच
  मुंबई महापालिकेच्या सभागृहात सध्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, सरदार पटेल, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती भालचंद्र भाटवडेकर, डोसाभाई कराका यांचे पुतळे तर नाना शंकरशेठ यांचे तैलचित्र आहे. मात्र या सभागृहात प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याआधी सावित्रीबाई फुले आणि वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे पुतळे बसवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र हे पुतळेही जागा नसल्याचे कारण देत अद्याप बसवण्यात आलेले नाहीत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.